आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Governmental Magic: 146 Crores Road Become 924 Crores Within 6 Months

सरकारी चमत्कार: 146 कोटींचा रस्ता सहा मह‍िन्यात झाला 924 कोटींवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - औरंगाबाद-वैजापूर-निफाड-नाशिक मार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पाची सहा महिन्यांपूर्वी मूळ किंमत 146 कोटी होती; मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्यावर्षी राज्यभरातील टोलनाक्यांना लक्ष्य केल्यानंतर आता याच प्रकल्पाची मूळ किंमत चक्क 924 कोटी रुपयांवर गेल्याचे दाखवण्यात आले आहे. ऐकून आश्चर्य वाटेल. मात्र, हा असा एकच बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावरील चौपदरी रस्ता नाही, तर नाशिकमधील सहाही प्रकल्पांच्या किमती दुपटी, तिपटीने वाढल्याचे स्पष्ट होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गतवर्षी टोलनाक्यांविरोधी आंदोलन सुरू केले होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाके फोडून वसुली बंद केली. मूळ प्रकल्पाची किंमत, होणारी वसुली, सद्य:स्थितीत किती रुपयांची वसुली केली जातेय, याची दडपण्यात आलेली माहिती, तसेच टोलनाक्यांवरील कर्मचार्‍यांच्या अरेरावीविरोधात मनसेने दंड थोपटले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी सर्व टोलनाक्यांवर इलेक्ट्रॉनिक बोर्ड उभारून प्रकल्पाच्या किमतीपासून ते वसुलीपर्यंतची आकडेवारी जाहीर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सर्व टोलनाक्यांवर इलेक्ट्रॉनिक्स बोर्डही कार्यान्वित करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाला मासिक टोल वसुलीची माहिती दिली जाऊ लागली.

मात्र, आताच्या आणि मनसेच्या आंदोलनापूर्वी दिल्या गेलेल्या मासिक टोल वसुलीच्या माहितीत जमीन-अस्मानचा फरक कसा झाला, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या अंदाजपत्रकातील सुधारित दुरुस्तीच्या प्रती ‘दिव्य मराठी’ला मिळाल्या आहेत. नाशिक-निफाड-वैजापूर-औरंगाबाद या चौपदरी रस्त्याचा उदाहरणादाखल विचार केला, तर गेल्यावर्षी प्रकल्पाची मूळ किंमत 146 कोटी दाखवली जात होती. आता वसुलीच्या कालावधीपर्यंत म्हणजेच 27 वर्षांत रस्त्याच्या दुरुस्तीपासून तर कर्मचार्‍यांच्या पगारापर्यंत किंबहुना बॅँकांकडून घेतलेल्या कर्जावरील चक्रवाढ व्याजाचा विचार करून थेट 924 कोटी रुपयांची किंमत निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच लोकांनी मूळ प्रकल्पाचा करही भरायचा. त्याची भरपाई झाल्यावर प्रकल्पासाठी कंत्राटदाराने घेतलेल्या कर्जाचीही परतफेड करायची, असा धक्कादायक प्रकार सुरू असल्यामुळे जनतेने कुणाकडे दाद मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


टोलचा फेरा सुटणार कधी?
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नवीन पत्रात एक तळटीप असून त्यात भविष्यात अतिरिक्त काम झाले किंवा प्रत्यक्ष काम करताना बदल झाले तर किमतीत व कालावधीत बदल होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच या मार्गांवरील टोलचा फेरा कधी सुटेल, याची शाश्वतीच नसल्यामुळे कराचा बोजा कायम राहणार आहे.


व्याजाच्या ‘दुष्टचक्रा’ची
अशीही वाढ

> 146 कोटी
नाशिक - वैजापूर मूळ किंमत
> 71 कोटी 91 लाख
आस्थापना-प्रशासकीय खर्च
> 28 कोटी 29 लाख
भू-संपादन- सेवा वाहिनी
> 16 कोटी 5 लाख
चलनवाढ
> 503 कोटी 92 लाख


23 वर्षांसाठी चक्रवाढ व्याज
पूर्वी प्रकल्पाच्या मूळ किमतीचाच आढावा घेऊन त्या प्रमाणात टोल वसुलीची मोजदाद केली जात होती. मात्र, आता त्यात बदल करून मूळ किमतीबरोबरच प्रकल्पासाठी घेतलेले कर्ज, त्यावरील चक्रवाढ व्याज, कर्मचारी-आस्थापना खर्च व अन्य बाबींचाही त्यात समावेश केल्यामुळे अंदाजपत्रक फुगल्याचे दिसते. पी. वाय. देशमुख, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक