नाशिक- दूरस्थ शिक्षण पद्धतीचा प्रवाह जगभरात रुजू लागला असून, मुक्त विद्यापीठाने कौशल्य विकसित करण्याबरोबरच तरुण उद्योजक घडवावे, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आवारात उभारण्यात आलेल्या दृकश्राव्य ग्रंथनिर्मिती केंद्र इमारतीच्या नवीन वास्तूचे उद्घाटन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते शनिवारी (दि. ६) झाले. या वेळी जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन, कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. अरुण जामकर, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशवाह, पालिका आयुक्त प्रवीण गेडाम, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव बनकर आदी उपस्थित होते.
वाङ्निश्चय कार्यक्रमाला उपस्थिती : काँग्रेसचेजिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांची कन्या अश्विनी तेलंगणाचे आमदार नारायण भोसले यांचे पुत्र अखिलेश यांच्या वाङ्निश्चयासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव, स्वामी समर्थ केंद्राचे अण्णासाहेब मोरे, स्वामी संविदानंद सरस्वती, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री गिरीश महाजन, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आदींनी हजेरी लावली.
कौशल्य प्राप्तीतून रोजगार संधी
विद्यापीठाच्या किऑक्स, डॉटनेट सिस्टिमवर आधारित विकसित केलेल्या वित्त लेखा व्यवस्थापन प्रणालीच्या सॉफ्टवेअरचे उद्घाटन राज्यपालांनी या वेळी केली. त्यानंतर राज्यातील विविध व्हर्च्युअल केंद्रातील विद्यार्थ्यांशीही संवाद साधताना त्यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत गुंतवणूक वाढणार असून, विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात केल्यास रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल, असे आवाहनही त्यांनी केले. याबरोबरच ग्रंथालय माहितीस्रोत केंद्र कुसुमाग्रज अध्यासनास त्यांनी भेट दिली.
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ‘सावरपाडा एक्सप्रेस-कविता राऊत’ हा धडा यंदा बालभारतीच्या पाचवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्याबद्दल कविता राऊत यांचा सन्मान केला.
केंद्रे सक्षम करा
मुक्तविद्यापीठाने शिक्षणापासून वंचित राहिलेल्या अनेकांना प्रवाहात आणले अाहे. ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी दूरस्थ शिक्षणाची मदत होत असल्याने विद्यापीठाने विभागीय केंद्र अधिक बळकट करण्याचे आवाहन राज्यपालांनी या वेळी केले. तसेच काही केंद्राची संख्याही वाढवावी असेही ते म्हणाले.