आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govind Pansare News In Marathi, Parliamentary Democracy, Divya Marathi

संसदीय लोकशाहीला निष्क्रियताच घातक,गोविंद पानसरे यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मतदानाच्या दिवशी मतदान न करता सहलीला जाणारे कोण असतात, असा प्रश्न उपस्थित करत आजचा मध्यमवर्गीय उंबरठय़ावर उभा राहून आपली निष्क्रियता व्यक्त करत आहे. ‘बदल अन् बिघाड’ या दोन्ही गोष्टी राजकारणीच करत असल्याने त्यांच्याबद्दल वाईट प्रवृत्ती (विचार) न करता संसदीय लोकशाहीतील महत्त्वाची घटना असलेल्या निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवून नेतृत्व केले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत अँड. गोविंद पानसरे यांनी येथे केले.
डॉ. सुधीर फडके सार्वजनिक वाचनालय आणि कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय थिंकिंग अकॅडमी यांच्या वतीने शालिमार चौकातील आयएमए सभागृहात डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेअंतर्गत ‘संसदीय निवडणुका-मध्यम वर्गाची भूमिका’ या विषयावर अँड. पानसरे बोलत होते. या प्रसंगी डॉ. डी. एल. कराड, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकर, प्रा. नागार्जुन वाडेकर, प्रा. प्रशांत देशपांडे, राजू देसले, मुकुंद दीक्षित, सचिन बोरसे आदींसह प्रेक्षक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
अँड. पानसरे पुढे म्हणाले की, मध्यमवर्गीयांनी इतिहास लक्षात न ठेवल्यामुळे अपप्रवृत्ती वाढल्या असून, त्यातून देशाचे नुकसान होत आहे. स्वातंत्र्याचा लढा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, आणीबाणी या सर्व चळवळींमध्ये मध्यमवर्गीयांनी नेतृत्व केले होते. परंतु, चांगल्याला चांगले म्हणण्याची दानत न ठेवल्यामुळे वाईटाचा पुरस्कार होत आहे. परंतु, या विचारांच्या प्रवाहातून समाजातील चांगल्या घटनांचे महत्त्व लोप पावणार आहे. सर्वच भ्रष्टाचारी असल्याचा प्रसार हा भ्रष्टाचारी प्रवृत्तींकडूनच मोठय़ा प्रमाणावर केला जात आहे. योग्य की अयोग्य याचे आकलन करण्याची पद्धत चुकत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. बदल आणि बिघाड हे राजकारणीच घडवित असतात. त्यामुळे सरसकट मत किंवा विचार व्यक्त करणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. स्वातंत्र्य लढय़ापासून ते आणीबाणीपर्यंत मध्यमवर्गीयांनीच कसे देशाचे नेतृत्व करून बदल घडविला, याची अनेक उदाहरणे अँड. पानसरे यांनी दिली.
लेखकांनी तटस्थ राहावे
चुकीचा इतिहास लिहिणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे अयोग्य माहिती वाचकांपर्यंत पोहोचत आहे. तसेच, खरा इतिहास लिहिणार्‍या लेखकांनाही भीती वाटत असून, ते लिहिण्याचे धाडस करीत नाहीत. परंतु, घडलेला इतिहास तटस्थपणे लेखकांनी पुढच्या पिढीसमोर मांडला तरच त्यांच्या ज्ञानात खर्‍या अर्थाने भर पडेल.
खुनी प्रवृत्तींची दखल घ्यावी
महात्मा गांधी आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनामागे असलेल्या प्रवृत्ती या फार जुन्या आहेत. विचारांचा खून करणार्‍या या प्रवृत्तींची दखल अभ्यासकांनी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा अँड. गोविंद पानसरे यांनी या वेळी व्यक्त केली. तसेच, या समाज विघातक प्रवृत्तींचा शोध घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.