आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाटातील ग्राम ज्ञानपीठातून पारंपरिक कलांना मिळणार संजीवनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आधुनिकतेच्या प्रभावामुळे पारंपरिक ज्ञान आणि कौशल्यावर आधारित भारतीय जीवनशैली लोप पावत चालली आहे. त्यामुळे विज्ञान तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात पारंपरिक कला जोपासत कला, विज्ञान, अध्यात्म आणि सामाजिक जाणिवेच्या माध्यमातून संपूर्ण बांबू केंद्रातर्फे मेळघाटामध्ये पहिले ग्राम ज्ञानपीठ साकारले जात आहे. सुमारे आठ एकरावरील या ज्ञानपीठात गुरुकुल असतील. त्याद्वारे पारंपरिक कलांचे ज्ञान आदिवासी बांधवांना दिले जाईल. बांबू केंद्राच्या माध्यमातून सुरू झालेला हा प्रवास आता ग्रामविकासाच्या ज्ञानपीठापर्यंत पोहोचला आहे. स्वयंपूर्णतेच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आता ग्रामसमृद्धी मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान देणार आहे.
मेळघाटातील धारणी तालुक्यातील लवाद येथे सुनील निरुपमा देशपांडे यांनी संपूर्ण बांबू विक्री केंद्र या संस्थेच्या माध्यमातून आदिवासींमध्ये आत्मनिर्भरता निर्माण करण्याचे काम सुरू केले. आदिवासी तरुणांना त्यांनी बांबूकला शिकवली. बांबूपासून टिकाऊ घर तयार करण्यापासून ते विविध आकर्षक कलावस्तूंपर्यंत अनेक गोष्टींचे ज्ञान मिळवत त्यांनी शेकडो आदिवासींना आधार दिला.
असे आहे ग्राम ज्ञानपीठ : आठएकरावर विस्तार, विणकाम, चर्मकला, धातूकाम, माती, बांबू, लाकूड, पाषाणशिल्प, लोककला, शेतीवर आधारित गुरुकुलांची उभारणी केली जात आहे. प्रत्येक गुरुकुलात संग्रहालयापासून प्रशिक्षण कार्यशाळा सभागृह. एकावेळी २०- २० युवकांना पारंपरिक कलांचे ज्ञान दिले जाईल. अभ्यागत कक्ष, किल्ल्यासारखी प्रतिकृती साकारलेले प्रवेशद्वार, श्रद्धास्थान, ओपन थिएटरही असेल.
कलांची जोपासना व्हावी
ग्राम ज्ञानपीठाद्वारे पारंपरिक कलांच्या जोपासनेसाठी दस्तऐवजीकरण केले जाणार आहे. नव्या पिढीला हे ज्ञान देण्यासाठी प्रयत्न केले जात असून, त्यातून स्वयंरोजगारही सुरू करण्यासाठी मदत होत आहे. खेड्यांच्या स्वयंपूर्णतेसाठी हे ज्ञानपीठ महत्त्वाचे ठरेल. -सुनील देशपांडे, संपूर्ण बांबू केंद्र, मेळघाट
बातम्या आणखी आहेत...