आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्योजकांनी सुचवलेली गावे अजून ‘छाननी’तच अडकली, ग्रामविकासाचे अभियान कागदावरच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - प्रसिद्ध उद्याेगपती रतन टाटा, आनंद महिंद्रा, कुमारमंगलम बिर्ला, बिग बी अमिताभ बच्चन या मान्यवरांना सोबत घेऊन राज्य सरकारने जाहीर केलेले ‘सहभाग’ अभियान अजूनही कागदावरच अाहे. यात सहभागी उद्योगांनी त्यांच्या १२०० गावांची यादी सरकारकडे सादर केली असली तरी ग्रामविकास खात्याकडून त्यांची अद्याप छाननी करणेच बाकी अाहे. दरम्यान, २३ नाेव्हेंबर राेजी या अभियानाअंतर्गत ‘पाणी’ विषयावर काम करणारे तज्ज्ञ, सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते यांची बैठक मुंबईत होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ ऑगस्ट राेजी टाटा, महिंद्रा, बिर्ला यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार, डॉ. अभय बंग, शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भटकर अादींच्या उपस्थितीत बैठक घेऊन आदर्श ग्रामविकासाचे शाश्वत मॉडेल म्हणून ‘सहभाग’ अभियानाची घोषणा केली. उद्योग क्षेत्रातील सामाजिक दायित्व निधी (सीएसआर), ग्रामविकासाच्या कामाचा अनुभव असलेल्या संस्था आणि व्यक्ती यांच्या एकत्रित समन्वयाने मागास गावांचा विकास करणे हा अभियानाचा उद्देश आहे.उद्योग क्षेत्रातून त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. पुढील दोन वर्षांत अभियानातून राज्यातील एक हजार मागास गावांचा विकास करण्याचा मनोदय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला होता. त्यात ५० टक्के आदिवासी गावांची निवड हा महत्त्वाचा निकष आहे. त्यानुसार दाेन ऑक्टोबरच्या ग्रामसभांमध्ये पहिल्या शंभर गावांचे विकास आराखडे मंजूर केले जातील, अशी घोषणाही त्या वेळी झाली होती.

प्रत्यक्षात हे अभियान अद्याप छाननीच्या पातळीवरच अडकलेले अाहे. पहिल्या बैठकीत सहभागी उद्योजकांपैकी निम्म्या उद्योगांनी सुमारे १२०० गावांचा विकास करण्यासाठी याेगदान देण्याची इच्छा व्यक्त करून त्यांची यादीही सरकारकडे पाठवली हाेती. अाता या अभियानाच्या समन्वयाची जबाबदारी असलेल्या ग्रामविकास खात्याकडून त्याची छाननी करून अंतिम यादी जाहीर करणे अपेक्षित अाहे.

परिषद तयार करणार अाराखडा
जिल्हा पातळीवर तेथील गावांची निवड केलेली उद्योग संस्था, ज्यांच्या माध्यमातून ते काम केले जाणार त्या सामाजिक संस्था, निवडलेल्या गावांचे प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी यांची जिल्हा पातळीवरील परिषद स्थापन केली जाईल. ही परिषद त्यांच्या जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करेल. हा आराखडा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सामाजिक संस्था आणि युवा कार्यकर्त्यांचीही निवड केली जात आहे. टाटा ट्रस्टच्या वतीने यासाठी १०० युवा कार्यकर्ते तयार करण्यात येणार आहेत.

उद्यापासून ‘श्रीगणेशा’
या अभियानाची सुरुवात म्हणून २३ नोव्हेंबरला पाण्याविषयी काम केलेले, अभ्यास आणि अनुभव असलेले राज्यातील सर्व तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक - शैक्षणिक संस्था यांची बैठक सह्याद्री अतिथिगृहावर बोलावली आहे. या गावांतील पाण्याचे नियोजन आणि संवर्धनाबाबत बैठकीत चर्चा आणि कृती कार्यक्रम निश्चित केला जाईल.
बातम्या आणखी आहेत...