आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा हिंदीत अनुवाद, महंत रघुनाथदास महाराज यांची संकल्पना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ग्रंथश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वरीतील प्रत्येक अध्याय म्हणजे अाध्यात्मिक ज्ञानाचा अथांग सागरच. ज्ञान, साधना आणि भक्तिमार्गाची शिकवण देणाऱ्या ज्ञानेश्वरीतील अमृततुल्य ज्ञानाचे भारतवासीयांना रसग्रहण करता यावे, यासाठी वारकरी संप्रदायाने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एक वेगळी संकल्पना राबवली आहे.

मराठीतील अाध्यात्मिक गोडवा अन्य भाषकांना ग्रहण करता यावा, यासाठी ज्ञानेश्वरीचे हिंदीत भाषांतर करण्यात आले अाहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या साधू-महंतांना अखिल भारतीय वारकरी संप्रदाय माउली धामतर्फे या अनुवादित ज्ञानग्रंथाची भेट दिली जाणार अाहे.
‘नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी’ या अाेवीतून प्रेरणा घेत जणू त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय वारकरी संप्रदाय माउली धाम या खालशाचे प्रमुख महामंडलेश्वर श्री महंत रघुनाथदासजी महाराज (देवबाप्पा) यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत अाहे. ‘श्रीज्ञानेश्वरी गुढार्थ दीपिका' या ज्ञानेश्वरीचा हिंदीत अनुवाद करण्यात आला असून याच्या प्रती कुंभमेळ्यासाठी आलेल्या जगद््गुरू, श्री महंत यांच्यासह आखाडे व खालशातील प्रमुख महामंडलेश्वर यांना भेट स्वरूपात दिल्या जाणार आहेत.
मराठी ज्ञान या साधू-महंतांना हिंदी भाषेतून अाकलन हाेण्यास साेपे हाेईल. त्यानंतर त्यांच्या सत्संग, प्रवचनातून हे अाध्यात्मिक ज्ञान देशभराील साधकांपर्यंत जाईल. त्यातून भक्तिमार्गाचा गोडवा वाढून मराठीतील ज्ञानसमृद्धतेचे स्वरूप दर्शनही देशवासीयांना हाेईल, असा उपक्रमाचा हेतू अाहे. सुमारे अकराशेहून अधिक पानांचे पुस्तक
बारा वर्षांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या कुंभमेळ्यातही साधू-संतांना ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देण्यात आला होता. ज्ञानदानाचा हाच उपक्रम या वर्षीच्या कुंभमेळ्यात साकारला जात अाहे. सिंहस्थ पर्वणी साधण्यासाठी नाशिकमध्ये चार लाख साधू-महंत येणार आहेत. त्यातील आखाड्यांतील प्रमुख जगद््गुरू, श्री महंत आणि खालशांतील प्रमुख महामंडलेश्वर अशा पाच हजार साधू-संतांना श्रीज्ञानेश्वरी गुढार्थ दीपिका (िहंदी) ही ग्रंथभेट दिली जाणार आहे. ११०० हून अधिक पानांच्या या ग्रंथाचे पुण्याच्या संस्थेने प्रकाशन केले आहे.
ज्ञानदान प्रसाराचा उपक्रम
संत ज्ञानेश्वरांनी गीतेवर केलेल्या भाष्यातून ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार झाला. मराठी भाषेतील हा अतुल्य ठेवा इतर भाषकांनाही ग्रहण करता यावा, यासाठी साधू-संतांना सर्वश्रेष्ठ ग्रंथभेट म्हणून दिला जाणार आहे. या उपक्रमातून ज्ञानदानाचे महत्त्व वाढून ज्ञानेश्वरीतील ज्ञानसाधनेचा प्रसार होण्यास मदत होईल.
- श्री महंत रघुनाथदासजी महाराज