आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युरोपच्या बाजारात नाशिकच्या द्राक्षांची चलती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - युरोपमधील सुपर मार्केटमध्ये दक्षिण अमेरिकेतील चिली या देशाकडून होणारा द्राक्ष पुरवठा यंदा अपुरा होत आहे. त्यामुळे भारताकडील नाशिकच्या द्राक्षांना मागणी वाढली आहे. तसेच विविध 12 देशांमध्ये या हंगामातील 17 फेब्रुवारीपर्यंत चार हजार 707 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली असून, गतवर्षी 17 फेब्रुवारीपर्यंत केवळ दोन हजार 580 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली होती. म्हणजे एकूण सुमारे सव्वादोन हजार मेट्रिक टन द्राक्षांची अधिक निर्यात झाली आहे.
यावर्षी प्रतिकूल हवामानावर मात करीत द्राक्ष उत्पादकांनी निर्यातक्षम द्राक्षे पिकविण्यासाठी मेहनत घेतली आहे. स्थानिक बाजारपेठेऐवजी परदेशी बाजारपेठा कवेत घेण्याचे स्वप्न बाळगणारे उत्पादक यशस्वी होत आहेत. द्राक्षांना सर्वाधिक मागणी असलेल्या युरोपच्या सुपरमार्केटमध्ये यावर्षी मोठय़ा प्रमाणात पुरवठा करणार्‍या चिलीचे थॉमसन सिडलेस द्राक्ष अपुर्‍या प्रमाणात येत आहे. त्यामुळे राज्यातील द्राक्षांना मागणी वाढली असून, निर्यातीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे.
राज्यातील द्राक्षांना इंग्लंड,र्जमनी, डेन्मार्क, बेल्जियम आणि नॉर्वे या देशांमध्ये दिवसेंदिवस अधिक मागणी वाढत असल्याने उत्पादकांना नवा हुरूप मिळत आहे. निर्यातक्षम द्राक्षांना चांगला दर मिळत असल्याने शासनातर्फे उत्पादकांना सुविधा पुरविण्यात येत आहे. हवामानावर आधारित पीक विमा, मार्गदर्शन शिबिर तसेच जिल्हा बॅँकांतर्फे कमी व्याजदरावर कर्ज देणे अशा विविध सुविधा देण्यात येतात. उत्पादकांना यावर्षी बेमोसमी पाऊस आणि खराब वातावरणाचा फटकाही सहन करावा लागला. किरकोळ बाजारातही द्राक्षांच्या नव्या जातींना पसंती मिळत असल्याने उत्पादक नवीन जातींची लागवड करीत आहे. राज्यात यावर्षी 23 हजार 95 ची निर्यातक्षम द्राक्षांच्या प्लॉटची नोंदणी झाली असून, जुने 13 हजार 498 तर नवीन 9 हजार 597 प्लॉट आहेत.
निर्यात होणार्‍या द्राक्षांमध्ये थॉमसन, शरद सिडलेस, नानासाहेब पर्पल, जम्बो या जातींना मागणी आहे. त्यामुळे निर्यातदारच नाही तर आता उत्पादक निर्यातदारही पुढे येत आहे.
निर्यात आणखी वाढण्याची शक्यता
युरोपच्या सुपर मार्केटमध्ये राज्यातील द्राक्षांना अधिक प्रमाणात बुकिंग होत असल्याने निर्यातीमध्ये वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे भविष्यात अधिक निर्यातीची शक्यता आहे. राजाराम सांगळे, द्राक्ष निर्यातदार