आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष उत्पादकांना कोट्यवधींचा फटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राज्यात जिल्ह्याचा पारा सर्वाधिक घसरला आहे. बुधवारी नाशिक शहरात किमान तपमान ७.९ तर निफाड तालुक्यात ६.२ अंश सेल्सियसची नोंद झाली अाहे. पाच ते सहा दिवस तापमान घसरण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. थंडीच्या कडाक्यामुळे नाशिकचे प्रमुख पीक असलेले द्राक्ष आकार आणि गोडवा टिकवून ठेवण्यासाठी उत्पादकांना प्रतिएकर साडेसहा ते सात हजार रुपये अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने त्यांचे बजेटच काेसळणार अाहे. नाशिक जिल्ह्यात निर्यातक्षम प्लाॅटची संख्या १५ हजारांच्या दरम्यान असल्याने १० कोटी ५० लाख रुपयांची अधिक आर्थिक उलाढाल होणार आहे. 
   
उत्तर भारतात किमान तपमान उणे चार ते पाचपर्यंत खाली गेल्याने त्या ठिकाणी हिमवृष्टी होत आहे. उत्तरेकडून वाऱ्याचा वेगही वाढल्याने उत्तर महाराष्ट्रातील तापमानात घसरण झाली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून किमान तपमान हे १० अंशांच्या आत आहे. दोन दिवसांपासून तापमानात अचानक घसरण झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. द्राक्ष पिकासाठी हवामान हे १५ ते ३५ अंशांदरम्यानच योग्य असते. तापमानात १० अंशांहून अधिक घसरण झाल्यास झाडाची क्रयशक्ती मंदावते. थंडीच्या कडाक्यामुळे झाडाची जमिनीतील मुळांची अन्नघटक ग्रहण करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे द्राक्षमण्याची फुगवण थांबून साखरेचा गोडवाही राहत नाही. यावर उपाय म्हणून द्राक्ष उत्पादकांना संजीवकांची फवारणी, डिंपिंग करावी लागते.  एक लिटर संजीवकांसाठी २ हजारापासून ते ३ हजार रुपयांपर्यंत खर्च येताे. डिंपिंगसाठीही संजीवकांसह मजुरी असा एकूण साडेसहा ते सात हजार रुपये प्रतिएकर खर्च येतो.  

थंडीमुळे परिणाम   
द्राक्ष हे नाजूक पीक असल्याने त्याची मोठ्या प्रमाणात काळजी घ्यावी लागते. अचानक थंडी वाढल्याने निर्यातक्षम द्राक्षावर त्याचा मोठा परिणाम होतो.  
-संदीप गोरे, द्राक्ष निर्यातदार   

खर्च वाया   
निर्यातक्षम द्राक्षांचा आकार, गोडवा याचे प्रमाण अपेडाच्या नियमाप्रमाणे ठेवावे लागते. थंडीमुळे मण्याचा आकार आणि गोडवा प्रमाणात झाला नाही. यापूर्वी केलेला खर्च वाया गेला.   
-विजय डांगले, द्राक्ष उत्पादक  

थाेडा धीर धरा
थंडीमुळे द्राक्ष उत्पादन १२० दिवसांऐवजी ते १६० ते १६५ दिवसांपर्यंत जाते. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनी सध्या पिकांवर अतिरिक्त खर्च करू नये.   
-जगन्नाथ खापरे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष निर्यातदार संघ  
 
ऊस उत्पादन घटल्याने चिपाडासाठी वणवण : जमिनीतील तपमान प्रमाणात राहण्यासाठी द्राक्षांच्या झाडाजवळ चिपाड, भुसा याचे मल्चिंग करतात. मात्र, उसाचे क्षेत्र घटल्याने चिपाडासाठी वणवण करावी लागत आहे.
   
रंगीत द्राक्षांच्या दराबाबत भीती : सध्या रंगीत द्राक्षांचा दर हा प्रतिकिलाे ११० रुपयांपासून ते १३० रुपयांपर्यंत आहे. थंडीचा कडाका अजून वाढल्यास द्राक्षावर परिणाम  होऊन दराबाबत उत्पादकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.   
बातम्या आणखी आहेत...