आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Graveyard Face Many Problems; Shortage Of Woods, Kerosin

स्मशानभूमींना लागले दुरवस्थेचे ग्रहण; लाकडे, केरोसिन आणावे लागते बाहेरून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वसामान्यांपासून, तर राजकारण्यांपर्यंत अगदी महापालिकेच्या मुखंडांचे नेहमीचे जेथे येणे-जाणे असते, अशा नाशिकमधील बहुतांश स्मशानभूमींना दुरवस्थेचे ग्रहण लागलेले दिसून येत आहे. कोठे पर्यावरणपूरक अशा डिझेल शवदाहिनीला अखेरची घटका मोजावी लागत आहे, तर कोठे केरोसिन, लाकडाच्या ठरवून दिलेल्या कोट्यातील परस्पर कपातीमुळे नातेवाइकांवर मनस्तापाची वेळ आली आहे.चेहेडी, विहितगावसारख्या स्मशानभूमीत तर नातेवाइकांवर बाहेरून लाकडे अन् केरोसिन आणण्याची वेळ येत आहे. मूलभूत सुविधा तर सोडाच; पण अंत्यसंस्कारासारख्या दु:खाच्या प्रसंगातही अनेकांची कशी गैरसोय होते, यावर डी. बी. स्टारने टाकलेला प्रकाशझोत...

कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करणा-या महापालिकेकडून स्मशानभूमींकडे कसे दुर्लक्ष होते, याचा माग घेण्यासाठी डी. बी. स्टार चमूने शहरातील प्रमुख स्मशानभूमींमध्ये ठाण मांडले. येथे शवदहनासाठी लागणा-या किमान इंधनाचा पुरवठा होतो की नाही, याची पाहणी केल्यावर अनेक ठिकाणी परस्पर इंधन पुरवठ्यात कपात केली जात असल्याचे समोर आले. नातेवाइक दु:खात असल्याचे बघून याबाबत कोणीही तक्रार करीत नसल्यामुळे दिवसेंदिवस कपातीतून कमाईचा धंदा फोफावत असल्याचे चित्र आहे.
समस्याच मणभर
एका मृतदेहाच्या दहनासाठी आठ मण लाकडे, पाच लिटर केरोसिन, एक पाटी गोव-या, तसेच एक मडके देण्याचे बंधन कंत्राटदाराला आहे. मात्र, बहुतांश स्मशानभूमींत केरोसिनच्या तुटवड्याचे नाव सांगत पाच लिटरऐवजी दोन ते तीन लिटरच रॉकेल दिले जात होते. काही ठिकाणी लाकडाची मोजदाद करण्याचा काटाही नादुरुस्त असल्यामुळे आठ मण लाकडे देण्यातही टाळाटाळ करण्यात आल्याची स्थिती दिसून आली.
तीन कोटींवर झाला खर्च
महापालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणच्या स्मशानभूमींवर कागदोपत्री तीन कोटींचा खर्च करण्यात आला आहे. त्यात सिडकोतील अंबड स्मशानभूमीवर सुमारे आठ लाख, पंचवटीतील अमरधामला आठ लाख, आडगाव अमरधामसाठी 21 लाख, नाशिकरोड वालदेवी नदीजवळील स्मशानभूमीसाठी 60 लाख, सातपूर परिसरातील स्मशानभूमीसाठी आठ लाख रुपयांचा खर्च करण्यात
आला आहे.
दरम्यान, महापालिकेच्या वतीने फेब्रुवारीपासून एका मृतदेहावर 1740 रुपये खर्च देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यानुसार वर्षाला होणा-या खर्चाचा एकंदरीत आकडा काढल्यास तो सुमारे दीड कोटी
रुपये इतका आहे.
लाकूड, इंधन पुरवठ्यातील कपातीतून फोफावतोय कमाईचा धंदा
तपोवनमधीलअमरधाम...
गोदावरीच्या किना-यावरील तपोवनाजवळील दोन्ही अमरधामध्ये प्रतिदिन किमान 7 ते 8 लोकांवर अंत्यसंस्कार केले जातात. येथे पाणी, बसण्याची जागा व अन्य समस्या कमी असल्या तरी लाकूड व केरोसिनमध्ये कपात केली जात असल्याच्या तक्रारी आहेत तसेच येथे मोठ्या प्रमाणात दारूड्यांचा वावर असल्यामुळे धोकाही पोहोचण्याची भीती व्यक्त केली जाते.
देवळालीगाव स्मशानभूमी
देवळालीगाव येथे शौचालय नसल्यामुळे अंत्यविधीसाठी येणाा-या महिलांचे हाल होतात. तसेच, अनियमितपणे पाणीपुरवठा होत असल्यामुळे अंत्यसंस्कारानंतर शुर्चिभूत होण्यासाठी अनेकांना जवळून पाणी आणावे लागत असल्याच्याही तक्रारी आहेत.
मोफत डिझेल शवदाहिनी मरणपंथाला
जुन्या नाशकातील अमरधाममध्ये आठ वर्षांपूर्वी मोफत अंत्यविधीसाठी महापालिकेने पर्यावरणपूरक डिझेल शवदाहिनी सुरू केली. वृक्षतोड, जळणातून तयार होणा-या हानिकारक वायूंचा पर्यावरणावर परिणाम होऊ नये, हा त्यामागचा उद्देश होता. प्रत्यक्षात या डिझेल शवदाहिनीकडे रिवाजाचे कारण देत पाठ फिरवली गेली. पालिकेचेही त्याकडे दुर्लक्षच झाले. डिझेल शवदाहिनीमधील भिंती ढासळू लागल्या असून, डिझेल पुरवठा करणा-या नलिकांनाही गळती लागल्यामुळे ही शवदाहिनीच मृत्युशय्येवर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
डिझेल शवदाहिनी वापर खर्च
> डिझेल शवदाहिनीचा वापर वर्षाकाठी केवळ 200 ते 250 जण घेतात. यात मृतदेहाची तत्काळ राख होते.
> एका मृतदेहासाठी लागते किमान 22 लिटर डिझेल.
> वर्षभरात सहा हजार लिटर डिझेलची गरज.
> डिझेल शवदाहिनीची देखरेख बांधकाम विभागांतर्गत केली जात असल्याने त्यावर कमीत कमी खर्च येतो.
स्मशानभूमींचा कायापालट करणार
डॉ. सुनील बुकाने, आरोग्याधिकारी यांना थेट प्रश्न
स्मशानभूमीमध्ये मूलभूत सुविधाही नाहीत?
- स्मशानभूमीच्या दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू केले जाईल. तसेच, मोरवाडी येथील स्मशानभूमीची स्वच्छता करण्याचे त्वरित आदेश दिले जातील.
ठेकेदाराकडून साहित्य पुरवठ्यात कपात केली जाते काय?
- महापालिकेने अंत्यसंस्कारासाठी आठ मण लाकूड पुरवणे बंधनकारक आहे. तसे होत नसेल, तर लोकांनी तक्रार करावी. तत्काळ ठेकेदारावर कारवाई केली जाईल.
मोफत अंत्यसंस्कारासाठी वर्षाला खर्च किती?
- महापालिका दरवर्र्षी मोफत अंत्यसंस्कारासाठी एक कोटी रुपये खर्च करते.
अंत्यविधीसाठी लाकडे कमी दिली जातात
महापालिकेने एका अंत्यसंस्कारासाठी 12 मण लाकडे, पाच लिटर रॉकेल, एक पाटी गोव-या व एक मडके द्यावे, असे ठेकेदाराला बंधनकारक आहे. मात्र, बहुतांश स्मशानभूमींत अत्यंत कमी लाकडे देण्यात येतात. त्याचप्रमाणे पाच लिटर रॉकेल न देता फक्त दोन ते तीन बाटल्या रॉकेल दिले जाते. - संजय महाले, नागरिक
नागरिकांना पुरेशा सुविधा मिळाव्यात
या ठिकाणी येणा-या नागरिकांना आवश्यक त्या सुविधा मिळतच नाहीत. रॉके लच उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. शासनाने मोफत अंत्यसंस्कार योजना राबविली आहे. मात्र, तरीही नागरिकांकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारी आहेत. ही अत्यंत गंभीर बाब असून, याबाबत लक्ष देणे गरजेचे आहे. - रत्नमाला राणे, नगरसेविका
अशी आहे स्थिती...
मोरवाडी स्मशानभूमी, सिडको
पूर्वी या भागात फक्त मोरवाडी गावातील लोक अंत्यसंस्कारासाठी येत. आता मात्र सिडको गृहप्रकल्प आल्यानंतर सर्वच लोक अंत्यसंस्कारासाठी येथेच येतात. या ठिकाणी मोफत अंत्यसंस्कारासाठीचा ठेका देण्यात आलेला ठेकेदार अत्यंत बेजबादार असून, त्याच्या बेजबाबदारपणामुळेच स्मशानभूमीची दुरवस्था झाली असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. या ठिकाणी अत्यसंस्कारासाठी पैसे घेतले जात असल्याच्या, तसेच कर्मचा-यांचे मद्य पिऊन काम करणे, नागरिकांशी बेशिस्त वर्तन करणे, अशा काही गंभीर तक्रारीदेखील आहेत. काही दिवसांपूर्वीच सिडको विभागातील नगरसेवकांनी प्रभाग सभेत या ठेकेदाराचा ठेका रद्द करावा, अशी मागणी केली होती. त्यासंदर्भात सभापती अरविंद शेळके यांनी पहाणी केली. मात्र, ठेकेदाराला राजकीय आश्रय मिळत असल्यामुळे त्याची मुजोरी सुरूच आहे. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
विहितगाव व चेहेडी स्मशानभूमी
विहितगाव स्मशानभूमीत शवदहनासाठी देवळालीगावातील स्मशानभूमीतून लाकडे आणावी लागतात. येथे पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे अनेकांचे हाल होतात. चेहेडी स्मशानभूमीत तर येण्यापूर्वी देवळालीगावातील स्मशानभूमीत मृत्यूची नोंद करावी लागते. येथे लाकडाची वखार नसल्याने नागरिकांना देवळालीगावातील वखारीतून लाकडे न्यावी लागतात. त्यासाठी तीनशे ते पाचशे रुपयांचा भुर्दंड बसतो.
सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज
महापालिकेने एका अंत्यसंस्कारासाठी 12 मण लाकडे, पाच लिटर रॉकेल, एक पाटी गोवा-या व मडके द्यावे, असे कंत्राटदाराला बंधनकारक आहे. मात्र, बहुतांश स्मशानभूमींत 12 मण लाकडाऐवजी कमी लाकडे देण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. स्मशानभूमींमध्ये चालणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी महापालिकेच्या वतीने सीसीटीवी कॅमेरे लावण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली आहे.
एका मृतदेहावर 1320 रुपयांचा खर्च
जून 2013 ते डिसेंबर 2013 पर्यंत शहरात सहा हजार मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी प्रतिशवामागे अंत्यसंस्कारासाठी 1320 रुपये देण्यात आले. डिसेंबरनंतर त्यात वाढ करण्यात आली आहे.