आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महायुतीमुळे महाआघाडीचे पालिकेत बिनसले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - प्रभाग समित्यांच्या गेल्या निवडणुकीत आकारास आलेल्या महाआघाडीत नुकत्याच झालेल्या प्रभाग सभापती निवडणुकीमध्ये ताटातूट झाली. यामुळे नव्या राजकीय समीकरणाने महायुती निर्माण होऊन महाआघाडीत पुन्हा एकदा बिनसले. या निवडणुकीत दोन्ही कॉँग्रेसच्या हाती सत्तेची एकही चावी लागू शकली नाही. आता आगामी स्थायी समिती निवडणुकीतही हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.

मनसे आणि भाजप युतीमुळे सत्तेपासून दूर राहिलेल्या दोन्ही कॉँग्रेस, शिवसेना, माकप आणि अपक्षांनी एकत्र येत महाआघाडीची रचना करत मनसेला स्थायी समिती आणि प्रभाग समित्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळच्या निवडणुकीत चित्र बदलत शिवसेना, मनसे-भाजप अशी महायुती झाल्याने महाआघाडीला हादरा बसला अन् एकाही समितीत सत्ता मिळाली नाही.

फ्रॅक्चर केलेले कसे चालतात : सत्ता घेऊन वर्षभरानंतर नवनिर्माणाचे काम होऊ न शकल्याने सर्वच पक्षांनी मनसेवर टीका केली. यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण शहरच फॅक्चर करून ठेवलयं असे सांगत शिवसेनेलाच लक्ष केले होते. या आरोपाला काही दिवस उलटत नाही तोच प्रभाग समित्यांमध्ये सेनेलाच सहभागी करून घेतल्याने फॅ्रक्चर करणारे मनसेला कसे चालतात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


विधानसभेची तयारी सुरू

आगामी विधानसभा निवडणूक तयारीच्या अनुषंगानेच महायुतीने सहाही प्रभाग समित्यांमध्ये आपले बस्तान बसविले. त्यानुसार पूर्व (पंचवटी, नाशिकरोड), मध्य आणि पश्चिम या तीन विधानसभा मतदार संघांमध्ये मनसेने आपलेच सभापती असतील अशी सोय केली, तर नाशिकरोडमध्ये शिवसेनेचे, तर पश्चिम प्रभाग समिती कार्यक्षेत्रात भाजपचे वर्चस्व असल्याने हे प्रभाग शिवसेना-भाजपच्या ताब्यात गेले. यामुळे ही सर्व रचना जणू काही विधानसभेची पूर्वतयारी असल्याचाच सूर निघू लागला आहे.


सत्तेसाठी वाट्टेल ते..
शिवसेनेवर शहर फ्रॅक्चर केल्याचा आरोप केल्यानंतर पुन्हा एकत्र येण्यामागचे गौडबंगाल काय असू शकते हे नागरिकांनीच ओळखून घ्यावे. उध्दव निमसे, माजी स्थायी समिती सभापती


करार शिवसेनेने मोडला
महाआघाडीतील लेखी करार शिवसेनेने मोडला. याचाच अर्थ शिवसेना सत्तेत सहभागी राहण्यासाठी प्रसंगी काहीही करू शकते असाच झाला आहे. शरद कोशिरे, शहराध्यक्ष- राष्ट्रवादी कॉँग्रेस


शिवसेनेने पाठिंबा दिलेला नाही
शिवसेनेने मनसेला पाठिंबा दिलेला नाही. कॉँग्रेस, राष्ट्रवादीकडून नाहक आरोप होत आहेत. प्रभाग निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीने निवडणूक अविरोध झाल्या. सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेता