आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्‍यायामशाळा कोमाता 'ग्रीन जीम' जोमात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महापालिकेतर्फे पंधरा वर्षांपूर्वीपासूनच ठिकठिकाणी व्यायामशाळा बांधण्यात येत आहेत. पालिकेकडूनच त्या व्यायामशाळांच्या साहित्यासाठी निधी दिला जात असल्याने अनेक नगरसेवकांनी त्यांच्या प्रभावक्षेत्रांमध्ये व्यायामशाळा बांधून घेतल्या. मात्र, त्या व्यायामशाळांपैकी निम्म्याहून अधिक व्यायामशाळा सध्या पूर्ण बंद अवस्थेत आहेत. ज्या व्यायामशाळा सुरू आहेत, त्यांची व्यायामाचे अर्धे साहित्य गायब, नाममात्र उपकरणे आणि मोकळी जागा, अशी दुरवस्था होऊन महापालिकेचे कोट्यवधीचे नुकसान झाले, तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष करीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही पक्षांकडून लाखो रुपये खर्च करून शहरात ठिकठिकाणी मोकळ्या मैदानांवर ‘ग्रीन जिम’ सुरू करण्यात येत आहेत.

‘ग्रीन जिम’द्वारे प्रचारावर भर
लोकांच्या झटपट लक्षात राहील अशी छोटी व मोठय़ा संख्येने विकासकामे करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘ग्रीन जिम’कडे बघितले जात आहे. यापूर्वी काही लोकप्रतिनिधींनी सोप्या प्रचाराच्या दृष्टीने राज्य परिवहन महामंडळाच्या थांब्यावर निवारा शेड बांधले होते. त्यातूनही चांगल्या पद्धतीने प्रचार करण्याचे तंत्र साधले गेले होते. राष्ट्रवादीबरोबरच मनसेकडूनही सिडकोसारख्या मोठय़ा विभागात ‘ग्रीन जिम’ची संकल्पना राबवण्याचा विचार सुरू झाला आहे.

कोट्यवधीचा खर्च पाण्यात
प्रत्येक व्यायामशाळा बांधण्यासाठी त्या-त्या व्यायामशाळेच्या क्षेत्रफळानुसार किमान सहा ते दहा लाख रुपये खर्च झालेला आहे. प्रत्येक व्यायामशाळेत नवीन व्यायामसाहित्य आणि उपकरण खरेदीवरदेखील दहा लाखांपर्यंत खर्च झालेले आहेत. त्यामुळे या बंद पडलेल्या सर्व व्यायामशाळांचे मिळून कोट्यवधीचा झालेला खर्च निष्फळ ठरला आहे. मात्र त्याबाबत प्रशासनाला किंवा संबंधित नगरसेवकांना कोणताही खेद नाही.

महिलांचीही गैरसोय
महिलांच्या व्यायामशाळांपैकी टकलेनगरमधील जिजामाता व्यायामशाळा अत्यंत आकर्षक उद्यानात स्थलांतरित झाली. मात्र, ही सुसज्ज व्यायामशाळा तीन वर्षांपासून बंदच आहे. चेतनानगर येथील महिलांच्या व्यायामशाळेलादेखील प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे.

व्यायामशाळा नावालाच
दुर्लक्षामुळे शहरातील बहुतांश व्यायामशाळांची दुरवस्था झाली आहे. बहुतांश व्यायामशाळांमधील उपकरणांचा वापरच होत नसल्यामुळे त्या केवळ नावापुरत्याच व्यायामशाळा ठरल्या आहेत. बाबा कोकणी, नागरिक

व्यायामशाळांसाठी खासगी संस्थेची नेमणूक
महानगरातील सहा विभागांमध्ये मिळून महापालिकेने 111 व्यायामशाळा बांधलेल्या आहेत. मात्र, सुमारे बारा कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या व्यायामशाळा कागदोपत्री दिसत असल्या, तरी प्रत्यक्षात त्यातील निम्म्याहून अधिक बंद आहेत. काही व्यायामशाळांमध्ये विविध समारंभ होतात, तर कुठे अडगळीचे साहित्य ठेवण्यात आले आहे. काही व्यायामशाळांना कायमस्वरूपी कुलूप असून, व्यायामाचे साहित्यदेखील गायब झाले आहे, तर काही व्यायामशाळा सुरूच झालेल्या नाहीत. एकीकडे ही स्थिती असताना आता दुसरीकडे महापालिका व स्थानिक आमदारांकडून कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात ठिकठिकाणी जॉगिंग ट्रॅक परिसरात अथवा मोकळ्या मैदानांवर ‘ग्रीन जिम’ सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे व्यायामशाळा कोमात आणि ‘ग्रीन जिम’ जोमात, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ‘ग्रीन जिम’चा हा अट्टहास कशासाठी केला जातोय, यावर डीबी स्टारचा प्रकाशझोत..

दुर्लक्षामुळे व्यायामशाळांची दुरवस्था
जुने नाशिक येथील खडकाळी परिसरातील व्यायामशाळेत दोन वर्षांपूर्वी बांधकाम झाल्यापासून व्यायाम साहित्यच आलेले नाही. त्यामुळे ती सुरूच होऊ शकलेली नाही. परिसरातील गत पंचवार्षिकातील नगरसेवकाने त्यांच्या निधीतून व्यायामशाळा बांधल्यानंतर तिचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्याच्या नादात राहून गेले. त्यानंतर नवीन नगरसेवक आल्याने त्यांच्याकडूनही फारसा रस दाखविला गेला नाही.

जुने नाशिक येथील मौला बाबा तालीमचे बांधकाम वर्षभरापासून सुरू आहे. त्या ठिकाणी नवीन व्यायामशाळेसह स्थानिक व्यावसायिकांसाठी गाळेदेखील काढण्यात आले आहेत. मौलाना बाबा तालीम येथे जुने नाशिक परिसरातील तब्बल दीडशे ते दोनशे युवक व्यायामासाठी दररोज यायचे. मात्र, वर्षभरापासून बांधकाम सुरू असल्यामुळे त्यांचा गैरसोय होत आहे.

पेठरोड येथील दत्तनगर व्यायामशाळा महापालिकेने बांधून दिल्यानंतर दोन वर्षे चालली. त्यानंतर महिन्याला 30 रुपये शुल्कदेखील दिले जात नसल्याने मेंन्टेनन्स अवघड झाल्यानंतर वादावादीचे प्रसंग उद्भवले.

प्रकरणाला राजकीय रंग चढल्यानंतर पाच-सहा वर्षांपासून व्यायामशाळा बंद पडली आहे.
पंचवटी येथील र्शीकृष्णनगरमधील र्शीकृष्ण व्यायामशाळा सुरुवातीला काही काळ चालली. त्यानंतर तीन वर्षांपासून व्यायामशाळा बंदच आहे. व्यायामशाळेचे नूतनीकरण सुरू असल्याच्या नावाखाली व्यायामशाळा

अद्याप बंदच पडलेली आहे.
आडगाव बस स्टॅण्डजवळ आडगाव व्यायामशाळेचा बांधकाम झाल्यानंतर अल्प काळ व्यायामशाळा सुरू राहिली. त्यानंतर व्यायामाचे साहित्य गायब झाल्याने तिथे व्यायामाऐवजी लग्नासह अन्य उपक्रमच सुरू झाले आहेत. या ठिकाणी व्यायामशाळेपेक्षा लग्न, वाढदिवससारख्या उपक्रमांनाच प्राधान्य मिळू लागल्याचे चित्र आहे.

सातपूर येथील मटालेनगर व्यायामशाळा 1996 मध्ये उद्घाटन झाल्यानंतर केवळ चार-पाच वर्षे सुरू राहिली. मात्र, आता त्यातील बहुतांश उपकरणांचे सुटे भाग झाले असून, त्यांची निगा ठेवली जात नसल्याने व्यायामशाळा असूनही नसल्याची स्थिती आहे. देखभाल व दुरुस्तीअभावी व्यायामशाळेतील साहित्य केवळ शोभेपुरतेच उरले आहे.

‘ग्रीन जिम’वर होतोय लाखोंचा खर्च
सध्या गोल्फ क्लब मैदानावर आमदार वसंत गिते यांच्या निधीतून सुमारे दहा लाख रुपये खर्च करून ‘ग्रीन जिम’ सुरू करण्यात आली आहे. सिडकोत आमदार नितीन भोसले यांच्या निधीतून संभाजी स्टेडियम येथे सुमारे सात लाख रुपये खर्च करून ‘ग्रीन जिम’ उभारण्यात आली आहे.