आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Greeting Function Eat 33 Lack Of Nashik Municipal Corporation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्काराच्या नावाने पालिकेत 33 लाखांचा ‘फुलो-या'ची नोंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शाल, पुष्पगुच्छ देऊन संबंधितांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारे महापालिकेचे कारभारी या थापेतून किती कमाई करीत असतील? लाख, दीड लाख.? अंदाज लावणार्‍यांच्याही डोक्याला झिणझिण्या येतील अशी ही आकडेवारी आहे. गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत केवळ हार, पुष्पगुच्छ आणि शालींवर महापालिकेने तब्बल 33 लाखांचा खर्च केला असल्याची माहिती उघडकीस आली आहे. म्हणजेच सत्काराच्या नावाखाली महिन्याला सरासरी एक लाख 10 हजार रुपये खर्च होत असल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी करण्यात आली आहे.

महासभेत प्रत्येकी 700 रुपयांचा अल्पोपाहार देणार्‍या पालिकेच्या मुखंडांनी छोट्या-छोट्या बाबींमध्येही कशी खाबूगिरी चालविली आहे, याचा मासलेवाईक नमुना म्हणजे हार, गुच्छ आणि शालींचा खर्च. माहितीच्या अधिकारात नगरसचिव विभागाने दिलेली माहिती अभ्यासली तर भल्याभल्यांच्या मेंदूला झिणझिण्या येतील. सेवानिवृत्तांचा सत्कार, गणेशोत्सव स्पर्धेतील पारितोषिक वितरण आणि तत्सम कार्यक्रमांशिवाय महापालिकेच्या वतीने हार, गुच्छ आणि शाली फारशा दिल्या जात नाहीत. तरीही प्रशासनाने या बाबींवर वारेमाप खर्च दाखवून पालिकेची तिजोरी रिती करण्यास हातभार लावला आहे.

घोलप यांच्या कारकिर्दीत 20 लाखांची ‘टवटवी’
नोव्हेंबर 2010 ते मार्च 2011 या चार महिन्यांच्या कालावधीत तत्कालीन महापौरांच्या अखत्यारितील कार्यक्रमांमध्ये हार आणि गुच्छांवर तब्बल एक लाख 93 हजार 655 रुपये, तर शालींवर एक लाख 43 हजार 560 रुपये असा एकूण 3 लाख 37 हजार 215 रुपये खर्च दाखविण्यात सत्काराच्या नावाने पालिकेत 33 लाखांचा ‘फुलोरा’आला आहे. या काळात शिवसेनेच्या नयना घोलप या महापौर होत्या. भाजपच्या तत्कालीन उपमहापौर प्रा. देवयानी फरांदे यांच्या अखत्यारित या चार महिन्यांच्या काळात केवळ हार आणि गुच्छांवर एक लाख दोन हजार रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. तर स्थायी समिती, सभागृहनेता, विरोधी पक्षनेता व अन्य पदाधिकार्‍यांच्या अखत्यारित या कालावधीत एक लाख 14 हजार 158 रुपये खर्च झाल्याचे दर्शविण्यात आले आहे. म्हणजेच या चार महिन्यांच्या कालावधीत 5 लाख 53 हजार इतका खर्च झाला आहे. त्यानंतर एप्रिल 2011 ते डिसेंबर 2011 च्या कालावधीत उपरोक्त पदाधिकार्‍यांनी शालींवर 5 लाख 46 हजार 25 इतका, तर हार आणि गुच्छांवर 9 लाख 62 हजार 950 रुपये इतका खर्च केला. या आठ महिन्यांच्या कालावधीत शाल, हार आणि गुच्छांवर 15 लाख 8 हजार 980 रुपये इतका खर्च झाला आहे. अशा प्रकारे घोलप यांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीत तब्बल 20 लाखांचा खर्च झाल्याचे निदर्शनास येते.


मनसेनेही खर्च केले 12 लाख
महापालिकेच्या गत काळ्याकुट्ट इतिहासाला पुसून नवनिर्माणाची दिशा दाखविणार्‍या मनसेलाही शाल, हार आणि गुच्छावरील खर्च आटोक्यात ठेवता आलेला नाही. सन 2012 ते 13 या वर्षाच्या कालावधीत हार आणि गुच्छांवर 10 लाख 85 हजार 800, तर शालींवर एक लाख 45 हजार 965 रुपये इतका खर्च झाला आहे. त्यात गेल्या मार्चमध्ये हार आणि गुच्छांवर 94 हजार 980, तर एप्रिलमध्ये 96 हजार 200 रुपये खर्च दाखविण्यात आला आहे.


खर्चाची लाखोंत उड्डाणे
* अडीच वर्षांत शालींवर 8 लाख 35 हजार 550 रुपये खर्च
* अडीच वर्षांत गुच्छांवर 24 लाख 58 हजार 573 रुपये खर्च
* विशिष्ट दुकानांमधूनच गुच्छ-शालींची खरेदी


खर्च हजारांत, बिले लाखात
महापालिकेत दिले जाणारे गुच्छ बघता ते प्रतिनग कमाल 50 रुपयांपर्यंत उपलब्ध होऊ शकतात. तसेच, शालही 50 रुपयांपर्यंतची दिली जाते. महापालिकेत प्रत्येकी 100 शाली आणि पुष्पगुच्छ दर महिन्याला देण्यात आले, असे गृहीत धरले तरीही त्याचा खर्च केवळ 10 हजारांपर्यंत होतो. असे असतानाही महिन्याची बिले सरासरी एक लाख 10 हजारांपर्यंत दाखवून संबंधित मोठीच ‘ढाय’ मारल्याचे बोलले जात आहे.


उच्च् न्यायालयात जाणार
नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. माहितीच्या अधिकारातून ही माहिती मिळाल्यानंतर मी अशा कारभाराविरुद्ध उच्च् न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.’’ योगेश घोडे, माहिती मिळविणारे