आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर महाराष्ट्राचा ग्राउंड रिपोर्ट: दिवाळीआधीच ‘लक्ष्मीदर्शना’चा खेळ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मतदानानंतर आठवडाभरात दीपोत्सव येत आहे. ती आली म्हणजे लक्ष्मीपूजनचा मुहूर्त हा ओघानेच आला. तव्द्तच मग निवडणूक ती कोणतीही असो, तेथे लक्ष्मीदर्शनाचा खेळ हा सध्या अपरिहार्यच झाला आहे. नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या मतदारसंघांमध्ये मतदानाच्या आठवडाभर आधीच एका फुलीला एक ते अडीच हजारापर्यंत भाव फुटल्याची चर्चा आहे. कितीही कठोर कायदे केले तरी हा ‘बाजार’ थांबू शकलेला नाही.
नाशिक जागा १५
मतांची लाट आणण्याचे आव्हान
नाशिक जिल्ह्यातील राजकारणामध्ये अपवाद वगळता घराणेशाहीला थारा मिळू शकलेला नाही. आजवर सलग दोन वा तीन वेळा निवडून आलेले खासदार वा आमदार अभावानेच दिसतील. एक मात्र खरे की, पूर्वाश्रमीच्या दाभाडी मतदारसंघावर हिरे घराण्याचा जवळपास चार दशके वरचष्मा होता. याच घराण्याकडे अनेक वर्षे मंत्रिपद राहिल्याने जिल्ह्याबरोबरच स्वत:च्या मतदारसंघाचा विकास घडवण्याची नामी संधी त्यांच्याकडे वारंवार चालून आली परंतु संधीचे सोने करण्यात सपशेल अपयशी ठरले. त्याचाच परिपाक म्हणजे तेव्हाचा दाभाडी व आताच्या मालेगाव बाह्य मतदारसंघातून मतदारांनी हिरेंच्या सगळ्याच वारसांना नाकारत शिवसेनेचे दादा भुसे यांना दोन वेळा निवडून दिले. सध्या भुसे हे हॅटट्रिकच्या मार्गावर आहेत. मतदारसंघाची शोधाशोध करीत हिरेंचे वारसदार अद्वय नांदगावमध्ये दाखल झाले असून कट्टर विरोधक छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज यांच्याशी कडवी झुंज देत आहेत. चाळीस वर्षांत मालेगाव तालुक्यातील पाण्याचा प्रश्न न सोडवू शकणारे हिरे विकासाच्या मुद्द्यावर लढणा-या भुजबळांना कसे तोंड देतात याकडे लक्ष लागले आहे. येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ स्वत: फडात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीतील ठेच लागल्यानंतर त्यातून सावरत व नव्या दमाने, नव्या डावपेचांसह भुजबळ हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत. मालेगाव, नांदगावसह येवला तालुक्याचा पाणीप्रश्न मांजरपाडा धरणाच्या माध्यमातून सोडण्याचा संकल्प भुजबळांनी केला आहे. त्यादृष्टीने कालव्याचे काम सुरू होऊन अखेरच्या टप्प्यात आहे. नेमका हाच मुद्दा आता येवल्यामध्ये कळीचा ठरला असून भुजबळांच्या वजनामुळे कालवा पूर्ण करायचा की नवख्या उमेदवाराला निवडून देऊन हेच काम लांबणीवर पडायला कारणीभूत ठरायचे, अशा पेचात मतदार सापडला आहे. जातीपातीच्या समीकरणांमुळे भुजबळांसमोर शिवसेनेचे संभाजी पवार यांनी ब-यापैकी आव्हान उभे केले आहे, हे निश्चित. तथापि दिवाळी तोंडावर आहे. ती चांगल्या रीतीने साजरी करायची आहे, असे सूचक उद्गार उमेदवारांचे समर्थकच काढू लागल्याने नांदगावसह येवल्यात लक्ष्मीदर्शनाचा खेळ जोरशोरसे चालेल, असेच एकूण चित्र आहे. नरेंद्र मोदी यांच्या नाशिकमधील सभेने फारसे चित्र पालटेल अशी स्थिती नाही. पाच महिन्यांपूर्वीच्या मोदी लाटेचा प्रभाव लोकांवर असला तरी तो या निवडणुकीत कितपत मतपेटीत परावर्तित होईल याबाबत साशंकता आहे. राहुल गांधी यांचीही सभा वणी येथे पार पडली. तुलनेने मोदींपेक्षाही राहुलच्या सभेला गर्दी अधिक होती. दिंडोरी, कळवण - सुरगाणा, मालेगाव मध्य, इगतपुरी, बागलाण, चांदवड या मतदारसंघांतील काँग्रेस उमेदवारांना ‘बुस्ट’ मिळवून देण्याकामी ही सभा उपयुक्त ठरू शकते. पाठोपाठ उद्धव ठाकरे यांचीही जंगी सभा नाशकात झाली. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेनेने भर दिल्यामुळे त्याचा परिणाम नाशिक मध्य, पूर्व, पश्चिम व देवळाली या चार मतदारसंघांसह सिन्नर, येवला, इगतपुरीत संभवतो. सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे विरुद्ध राजाभाऊ वाजे यांच्यात काट्याची लढत आहे. निफाडमध्येही आमदार अनिल कदम यांच्यासमोर राष्ट्रवादीचे दिलीप बनकर यांनी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करून ठेवले आहे. कांदा असो की शेतीचे प्रश्न, हा मुद्दा भाजपला तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत. त्याचा फटका प्रामुख्याने चांदवड, निफाड, येवला, कळवण, दिंडोरी, बागलाण, नाशिकचा काही भाग या ठिकाणी संभवतो.

नंदुरबार जागा ४
नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा. येथील चारही मतदारसंघांत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याच कुटुंबांतील सदस्यांची चर्चा आहे. नंदुरबारमध्ये डॉ. गावितांना काँग्रेसचे कुणाल वसावे यांचे कडवे आव्हान आहे. शहाद्यात तिरंगी लढत आहे. एका रात्रीत शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले राजेंद्र गावित, माजी मंत्री अँड. पद्माकर वळवी, भाजपचे पाडवी यांच्यात चुरस आहे. नवापूरमध्ये माजी मंत्री सुरूपसिंग नाईक व राष्ट्रवादीचे शरद गावित यांच्या दुरंगी लढत आहे. थोडक्यात, जिल्ह्यातील चारपैकी तीन मतदारसंघांत डॉ. गावित कुटुंबांतील सदस्य लढत देत आहेत. अक्कलकुवा येथे भाजपमध्येच बंडखोरी झाली आहे. पक्षाचे उमेदवार नरेश पाडवी यांना माजी आमदार व बंडखोर नरेंद्र पाडवी यांनी अडचणीत आणले आहे. पाडवी यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली आहे. एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या नंदुरबारमध्ये भाजप, शिवसेना अन् मनसेने शिरकाव करीत बस्तान बसवायला सुरुवात केली आहे.

धुळे जागा५
धुळे जिल्ह्यात काँग्रेसकडे दोन तर शिवसेना, भाजप आणि लोकसंग्राम या पक्षांकडे प्रत्येकी एक मतदारसंघ आहे. यंदा युती व आघाडी तुटल्याने एकमेकांचे मित्र आता शत्रू बनले आहेत. धुळे शहरात भाजपचे आमदार अनिल गोटे यांना राष्ट्रवादीचे राजवर्धन कदमबांडे व शिवसेनेचे सुभाष देवरे यांच्याशी टक्कर द्यावी लागणार आहे. धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी फडात उतरून लढत देण्याऐवजी मुलगा कुणाल याला पुढे केले आहे. शिवसेनेचे आमदार प्रा. शरद पाटील पुन्हा नशीब आजमावत आहेत. दिवंगत माजी आमदार द. वा. पाटील यांचे पुत्र मनोहर भदाणे हे भाजपकडून लढत आहेत. साक्री, शिरपूर, शिंदखेड्यातील लढती अटीतटीच्या आहेत. आमदार जयकुमार रावल व माजी आमदार अमरीशभाई पटेल यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. आदिवासींची मते पारंपरिक पद्धतीने काँग्रेसकडे वळणार की मोदी लाट चालणार हे चित्र धूसर आहे. धुळे जिल्ह्यातही निवडणुकीआधीच लक्ष्मीदर्शनाचे मोठे स्तोम माजले आहे.

जळगाव जागा ११
जळगाव शहर व ग्रामीण, मुक्ताईनगर, जामनेर, अमळनेर, भुसावळ या मतदारसंघांतील लढती अत्यंत चुरशीच्या आहेत. मुख्यमंत्रिपदाचे दावेदार नाथाभाऊ खडसे यांचा सामनादेखील सोपा नाही. तुरुंगातून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे सुरेश जैन व राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांचे राजकीय भवितव्य त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाविना मतदार ठरवणार आहेत.राष्ट्रवादीतून भाजपत उडी मारलेले संजय सावकारे असो की जामनेरमधील गिरीश महाजन, यांना मोदी लाट तारणार की नाही हेही स्पष्ट होणार आहे. निवडणूक घोषित होण्यापूर्वी विजयाचा अंदाज असलेले दिग्गज स्वबळाच्या प्रयोगामुळे अडचणीत आले आहेत. मोदी लाटेच्या प्रभावावरच भाजपच्या उमेदवारांच्या आशा लागून राहिल्या आहेत. चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल, चोपडा या मतदारसंघांतील लढती चुरशीच्या आहेत. भाजपसमोर शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादीचेही आव्हान उभे राहिले आहे. व्यक्तिगत प्राबल्याबरोबरच लक्ष्मीचा प्रभावही जाणवण्याची शक्यता आहे.