आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ground Report Of North Maharashtra For Maharashtra Assembly Election 2014

उत्तर महाराष्ट्राचा ग्राउंड रिपोर्ट: 'अंदर'वाले सुसाट; कोलांटवीरांची चलती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महायुती, आघाडी तुटल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील ३५ विधानसभा मतदारसंघांमधील राजकारण ढवळून निघाले आहे. न्यायालयाच्या दणक्यामुळे एक तर निवडणूक रिंगणातूनच बाहेर फेकल्या गेलेल्या वा अद्यापपावेतो अशा निकालांच्या प्रतीक्षेमुळे अंदर-बाहर करूनही तुरुंगातच जीव टांगणीला लागलेल्या मातब्बरांच्या असो की ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोयीसोयीने कोलांटउड्या मारणा-यांच्या उमेदवा-या... अशा विविधांगी कारणांमुळे यंदाची निवडणूक गुंतागुंतीची ठरली आहे.
* नाशिक (१५ जागा)
भुजबळांची प्रतिष्ठा पणाला, मनसे आमदारांकडे लक्ष
नाशिक- निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुती वा आघाडी राहणार की नाही याकडेच सर्वसामान्य मतदारांचे लक्ष होते. तशा आशयाचेच चर्वितचर्वण ‘राजकीय घटस्फोटां’च्या दिवसापर्यंत तळागाळापर्यंत सुरू होते. त्यामुळे त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार राजकीय आडाखे बांधले गेले. पण आता चित्र स्पष्ट झाल्यानंतर कोण किती पाण्यात आहेत याबाबत तर्क सुरू झाले आहेत. नाशिक लौकिकार्थाने मुंबईची परसबाग तर पंतप्रधानांच्या प्रभावाखालील गुजरातच्या सरहद्दीला लागून आहे. गुजराती मतदारांचा टक्का पंचवटी परिसरात बऱ्यापैकी असला तरी भाजपला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन जाऊ शकणार नाही. नाशिक शहरामध्ये मध्य, पश्चिम, पूर्व आणि देवळाली असे चार मतदारसंघ आहेत. त्यापैकी तीन मतदारसंघांवर अनुक्रमे वसंत गिते, अ‍ॅड. उत्तमराव ढिकले व नितीन भोसले यांच्या रूपाने मनसेची पकड आहे. शिवसेनेचे वादग्रस्त माजी आमदार बबन घोलप सलग पाच वेळा देवळालीमधून निवडून येत आहेत. पण त्यांना आता कोर्टानेच बंदी करून टाकली आहे. राज ठाकरे पर्यायाने मनसे यांचा कारभार व नाकर्तेपणा हाच मुद्दा या पक्षाच्या मुळावर येण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील चर्चेत असलेल्या मतदारसंघांत येवला, नांदगाव, सिन्नर, कळवण, निफाड, इगतपुरीचा समावेश होतो. राष्ट्रवादीचे छगन भुजबळ व त्यांचे पुत्र पंकज हे अनुक्रमे येवला व नांदगावातून लढत आहेत. या दोन्ही मतदारसंघांत वंजारी, मराठा,माळी, दलित अन् मुस्लिम मतदारांच्या निर्णायकी भूमिकेवर भुजबळ पिता-पुत्राचे भवितव्य अवलंबून आहे. सिन्नरमध्ये आमदार माणिक कोकाटे यांनी लोकसभा निवडणुकीत भुजबळांच्या पायात पाय घातला होता. त्याचे उट्टे काढण्यासाठी सिन्नरमध्ये चढाओढ सुरू आहे. मालेगाव बाह्य व मध्य, दिंडोरी, बागलाण व चांदवड येथेही चुरस आहे. तिकीट नाकारल्यामुळे बंडखोरी वा कोलांटउडीचे प्रकार जिल्ह्यात झाले. नऊ आमदार पुन्हा भवितव्य आजमावत आहेत.
* नंदुरबार (०४ जागा)
काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर डॉ. गावित बंधूंचे आव्हान
नंदुरबार- आदिवासीबहुल अशी ओळख असलेला नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र, लोकसभा निवडणुकीपासून राजकीय वर्तुळात उलथापालथ झाली. याचा फटका सलग नऊ वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येणारे माणिकराव गावित यांना बसला. त्यांना लोकसभा निवडणुकीत पराभवला सामोरे जावे लागले. काँग्रेसच्या पारंपरिक गडालाच भगदाड पाडण्यास माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे कारणीभूत ठरले. त्यांनी सुरुवातीला राष्ट्रवादीशी अन् त्यानंतर त्यांच्याशी जमले नाही म्हणून भाजपशी घरोबा करीत कन्या डॉ. हिनाला खासदार केले. पाठोपाठ तेदेखील भाजपत दाखल झाले. सध्या, डॉ. गावित कुटुंबीयांच्याच ताब्यात असल्यागत नंदुरबार जिल्ह्याची अवस्था झाली आहे. विद्यमान युवक कल्याण व क्रीडामंत्री पद्माकर वळवी हे शहादा मतदारसंघातून, तर तुरुंगवास भोगलेले काँग्रेसचेच माजी वनमंत्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक हेही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दोघांपुढे डॉ. गावितांचे बंधू अनुक्रमे शिवसेनेकडून राजेंद्र गावित आणि राष्ट्रवादीकडून शरद गावित यांची लढत असेल. अक्कलकुव्यातही तिरंगी लढत रंगणार आहे.

* जळगाव (११ जागा)
खडसे, जैन, देवकरांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष
जळगाव- जिल्ह्याच्या ११ मतदारसंघांपैकी बहुतांश ठिकाणच्या निवडणुका पूर्णत: व्यक्तिकेंद्री आहेत. भाजपमधील मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार एकनाथ खडसे यांचा हा जिल्हा. त्यांच्या पक्षाचे दोन खासदार येथून लोकसभेवर निवडून जातात. म्हणजे ब-यापैकी पक्षाचा प्रभाव, पण भ्रष्टाचार वा लाचखोरीच्या बदनामीचा डाग लागला तोही येथील भाजपच्याच खासदारांकरवी. तीच परंपरा पुढे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश जैन व राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांच्या रूपाने अव्याहत चालू आहे. जैन व देवकर हे दोन्हीही माजी मंत्री. घरकुल घोटाळ्यातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून गेल्या अनेक महिन्यांपासून तुरुंगात आहे. आरोप अद्याप सिद्ध व्हायचे आहेत, आरोपांचा निकाल काय तो लागयचा लागेल, पण या दोहोंनी तुरुंगातूनच उमेदवारी दाखल केली आहे. ‘कभी अंदर तो कभी बाहर’ अशा भूमिकेत वावरणा-या या दोन्ही उमेदवारांची निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, अशा या प्रभावशील जिल्ह्यामध्ये भाजपचे दोन आमदार आहेत. पाच मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वरचष्म्याखाली आहेत. शिवसेना व अपक्ष असे प्रत्येकी दोन मतदारसंघ त्यांच्या ताब्यात आहेत. महायुती तोडण्याकामी नाथाभाऊंनी शकुनीमामाची भूमिका ख-या अर्थाने पार पाडल्याचा वहिम शिवसेनेचा आहे. त्यामुळे सेनेच्या रडारवर नाथाभाऊ आहेत. निवडणुकीत त्यांचा काय फैसला होतो याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री व भुसावळचे आमदार संजय सावकारे राजकीय हवेचा झोत लक्षात घेता भाजपत गेले अन् त्यामागेही नाथाभाऊंच असल्याचे बोलतात. जळगाव शहर व ग्रामीण, मुक्ताईनगर, एरंडोल, अमळनेर, चोपडा, पाचोरा, चाळीसगाव, रावेर, जामनेर, भुसावळ असे हे मतदारसंघ आहेत. एकेकाळी दिग्गज म्हणून गणले जाणारे गजाआड असल्यामुळे तसेच काहींनी पक्षांतर केल्याने या जिल्ह्यातील निवडणूक रंगतदार तसेच चुरशीची होण्याची लक्षणं आहेत.