आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Group Marriage Ceremony Issue At Nashik, Divya Marathi

सामुदायिक विवाह सोहळे काळाची गरज- पालकमंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सामूहिक विवाह सोहळ्यांतून जनमानसात सामाजिक एकात्मतेचा संदेश रुजला जातो. त्यामुळे हे विवाह सोहळे ही समाजाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
वडाळारोड परिसरातील रहेनुमा शाळेजवळील प्रांगणावर हजरत कायदा-ए-मिल्लत सय्यद मोइन अशरफ साहब किबला यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी पाच जोडपी विवाहबद्ध झाली. उडान एज्युकेशनल अँण्ड वेल्फेअर सोसायटीतर्फे आयोजित या सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी भुजबळ बोलत होते. या वेळी माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी नगरसेवक मुशीर सय्यद, सलीम शेख, अँड. सय्यद तय्यब कासीम, खान गौस नूर अलानूर, युथ सोसायटीचे अध्यक्ष हाजी बबलू पठाण, हाजी रऊफ पटेल, सुनील बागुल, शैलेश कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री भुजबळ पुढे म्हणाले, सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. विवाहावर नाहक होणारा अमाप खर्च सामुदायिक विवाह सोहळ्यांतून टाळता येऊ शकतो. हाच पैसा संसारासाठी वापरावा, असे आवाहन करत सामुदायिक विवाह सोहळा ही काळाची खरी गरज बनली असल्यामुळे असे सामुदायिक विवाह सोहळे प्रत्येक ठिकाणी आयोजित करण्यात यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. तसेच, विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांना शुभेच्छा दिल्या.

उडान संस्थेतर्फे सुरू असलेल्या या सामाजिक कार्यामुळे अनेक कुटुंबांवर पडणारा कर्जाचा बोजा कमी होत आहे. यामुळे असे चांगले कार्य उडानच्या पदाधिकार्‍यांनी यापुढेही सुरू ठेवावे, तसेच संस्थेच्या या कार्याला पाठिंबा देण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुशीर सय्यद यांनी केले. अँड. तय्यब सय्यद यांनीही संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करत शहरातील अन्य संस्थांनीदेखील या प्रकारे उपक्रम राबवून सामुदायिक विवाह सोहळ्यांसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.संसारोपयोगी साहित्याची भेट विवाहबद्ध जोडप्यांना उडान सोसायटीतर्फे लोखंडी कपाट, टेबल फॅन, मिक्सर, दिवाण आदी संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात आले.

संस्थेने जुळविले 112 विवाह
उडान एज्युकेशनल सोसायटीने 2001 मध्ये पहिला सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता. तेव्हापासून आजवर या संस्थेने स्वखर्चाने तब्बल 112 जोडप्यांचे लग्न लावून दिले. प्रत्येक वर्षी वाढणारी जोडप्यांची ही संख्या शंभरावर पोहोचेल, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.