आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Guardian Minister Bhujbal Advice Nashik Divya Marathi

पालिकेने आपल्या हिश्श्याचा निधी उभारावा - पालकमंत्री भुजबळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने स्वत:च्या उत्पन्नातून कराव्या लागणार्‍या सिंहस्थाच्या दोनतृतीयांश हिश्श्याच्या कामांसाठी पैसे नसल्याने शासनानेच पूर्ण निधी द्यावा, अशी मागणी महापौर अँड. यतिन वाघ यांनी केली. यावर पालकमंत्री छगन भुजबळांनी इतर विभागांनी त्यांच्या निधीतून कामे सुरू केली असल्याने महापालिकेने असा पूर्ण निधी मागणे सयुक्तिक नाही. त्यांनी तो उभा करावा., अशी सूचना केली.

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आवश्यकता भासल्यास राज्य शासनाकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न करू. नव्या केंद्र शासनास पत्र देऊ मात्र, सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पालिकेस सिंहस्थाच्या विविध कामांसाठी एक हजार 52 कोटी 61 लाख रुपयांची आवश्यकता असून, पालिकेने आपल्या उत्पन्नातून उभी करायची दोन तृतीयांश रक्कम म्हणजे जवळपास 700 कोटी रुपये इतकी आहे. मात्र, ही रक्कम उभी करणे पालिकेस शक्य नाही. कारण एलबीटीमुळे पालिकेचे उत्पन्न 30 टक्के घटले आहे. त्यामुळे संपूर्ण निधी शासनानेच द्यावा, अशी मागणी महापौर अँड. वाघ यांनी या बैठकीत केली. परंतु ठरल्याप्रमाणे त्या-त्या विभागाने त्यांच्या निधीतून कामे करायची असून, पालिकेनेही ती करावी. कारण या सुविधा नंतर पालिकेच्या नियमित कामांचाच एक भाग होणार आहेत, असा सूर या बैठकीत निघाला.

पालिकेस 350 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यातील 260 कोटी रुपये सिंहस्थ कामांसाठी खर्च होणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. पालिकेला आतापर्यंत 222.17 कोटी रुपये वितरित झाले असून, 46 कामे शेवटच्या टप्प्यात असल्याने ती वेळेत पूर्ण होतील, असे आयुक्तांनी सांगितले. परंतु साधुग्रामसाठी जागा संपादित झाली नाही. ती कायमस्वरुपी पालिकेस हस्तांतरित करावी. त्याचा 1:10 टक्के टीडीआर देण्याचा ठराव शासनास पाठवला आहे. त्यास मान्यता देण्याची मागणी महापौरांनी केली. यावेळी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. चेंगराचेंगरी झालेल्या ठिकाणाचा उतार कमी करा : गेल्या वेळी चेंगराचेंगरी झालेल्या ठिकाणचा उतार कमी करणे आवश्यक आहे. त्यासाठी काय उपायोजना करणार अशी विचारणा पालकमंत्र्यांनी करत त्यावर त्वरित काम करा व स्थानिक लोकप्रतिनिधींनाही त्यात समाविष्ट करून घ्या. साधुग्रामसाठी भूसंपादनास होणारा विरोध त्यामुळे कमी होऊ शकतो व इतर प्रश्न निकाली निघू शकतील, असे मत व्यक्त केले.

नियोजनात डावलले; आमदार ढिकलेंचा आरोप
ज्याठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे, त्या पंचवटीचा मी आमदार आणि माझा मुलगा नगरसेवक असतानाही सिंहस्थाच्या नियोजनातून आम्हालाच डावलण्यात आले आहे तेथे इतरांचे काय, असा प्रश्न उपस्थित करत आमदार अँड. उत्तमराव ढिकले यांनी नाराजी व्यक्त केली. इतर आमदारांनीही त्यास सहमती दश्रवली. आमदार निर्मला गावित यांनी त्र्यंबकेश्वरच्या आसपासच्या गावांतही प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आमदार माणिकराव कोकाटे यांनी शिर्डी बायपासवर निवारा शेड पायी चालणार्‍यांसाठी स्वतंत्र ट्रॅकची मागणी केली. नाशिक-सिन्नर रस्त्यांचेही काम त्वरित करण्याची मागणी केली.

सार्वजनिक बांधकाम वगळता इतर विभाग मागेच
सार्वजनिक बांधकाम व पर्यटन विभागानेच कामे सुरू केली; मात्र महापालिका, पाटबंधारे, विद्युत विभाग, एमजीपी, आरोग्य हे सर्व विभाग यात मागे आहेत. त्यामुळे 14 महिन्यांपैकी दीड महिना विधानसभा आचारसंहितेत जाईल तर पाऊस सुरू होणार असल्याने 10 महिन्यात सर्व कामे पूर्ण करण्यासाठी कामाचा वेग वाढवावा. कमीत कमी घाट बांधणी तरी वेळेत करा, असे आदेश भुजबळ यांनी दिलेत.