आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांसह महापौरही ध्वजारोहणाच्या परीक्षेत उत्तीर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- भाजपचेअध्यक्ष अमित शहा यांच्यासारखे हेवीवेट व्यक्तिमत्त्व, बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुरस्कारावरून वादात सापडलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यासोबतच महिनाभरापासून नाशिकच्या भूमीत दाखल झालेल्या विविध आखाड्यांच्या साधू-महंतांमध्ये सुरू असलेल्या राजी-नाराजी नाट्याच्या या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण असा आखाडा ध्वजारोहण सोहळ्याचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्यामुळे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबरच यजमानपद घेणाऱ्या नाशिक महापालिकेचे महापौर अशोक मुर्तडक हे सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवरील पूर्वपरीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले, असा शेरा उपस्थितांनी दिला.

जणू वादाचेच केंद्र झालेल्या साधुग्रामसह कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाबरोबरच पालकमंत्र्यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची अनेक दिवसांपासून धावपळ सुरू आहे. साधुग्राममधील गैरसुविधांवरून महंतांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत बहिष्काराची भाषाही केली होती. मात्र, कधी समजूत काढत तर कधी राजकारण करण्याचे कडवे डोस पाजत नाराजांना वश करण्यात आयोजक यंत्रणेने यश मिळवले. दुसरीकडे पुरोहित संघाच्या ध्वजारोहण सोहळ्यात महापालिकेचे नगरसेवक शहरातील प्रतिष्ठित लोकप्रतिनिधींचा चांगलाच अवमान झाला होता. त्याबाबत महासभेत मानापमान नाट्य रंगून पोलिसांबरोबरच यंत्रणेवर टीकेचे आसूड ओढले गेले. खुद्द महापौर आणि उपमहापाैरांनाही दुय्यम स्थान दिले गेल्यामुळे बुधवारी होणाऱ्या आखाडा ध्वजारोहणाच्या निमित्ताने महापालिकेने चोख उत्तर देण्याची तयारी केली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी होणाऱ्या सोहळ्याच्या यशस्वीतेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, पालकमंत्री गिरिश महाजन महापौर अशोक मुर्तडक यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने चोख नियोजन केल्यामुळे विनाविघ्न सर्व कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांना नुसतेच स्थान नव्हे, तर त्यांना योग्य तो सत्काराचा मानहीदिला गेला. त्यामुळे मान्यवरांनी भाषणातून पक्षीय जोडे बाजूला ठेवून एकत्रित कुंभमेळा यशस्वी करण्याची ग्वाहीही दिली.
शरद आहेरांचा भडका
व्यासपीठावरजाण्यापासून काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांना रोखले गेले. पोलिसांनी यादीत नाव नसल्याचे सांगितल्यावर ते संतापले. त्यांनी पोलिसांसह लोकप्रतिनिधींना फैलावर घेतले. पालकमंत्रीगिरीश महाजन यांनी आहेर यांना समजवण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्यातही वाद झाला. ‘कार्यक्रमाचे निमंत्रण विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना नाही, तसेच व्यासपीठावर काँग्रेसच्या नेत्यांनाच का स्थान नाही,’ असा सवाल आहेर यांनी केला. त्यावर पालकमंत्र्यांनी विखे पाटील यांना रितसर निमंत्रण दिल्याचे सांगितले. नगरसेवक आकाश छाजेड यांच्याकरवी महापौर मुर्तडक यांनी विखे पाटील यांना दूरध्वनीद्वारे निमंत्रण दिल्याचेही सांगितले गेले. त्यानंतर मनधरणी करून आहेर यांना व्यासपीठावर नेण्यात आले.