आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदूक नाही, नक्षलवाद विचारांतूनच मिटेल, ध्रृव कटोच यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दुर्गम, आदिवासी भागातील लोकांना राज्यघटनेप्रमाणे सोयी-सुविधा नाहीत. विकासापासून वंचितच ठेवण्यात आलेले आहे. अविकसितपणामुळे निराश झालेल्या नागरिकांच्या मनात नक्षलवादाची पेरणी उग्रवादी विचारांचे लोक करतात. फक्त बंदुकीचा, सैन्याचा वापर करून नक्षलवाद संपवणे अवघड असून, सर्वसमावेशक विकास या विचारसरणीद्वारेच नक्षलवाद हद्दपार होऊ शकतो, असे प्रतिपादन निवृत्त लेफ्टनंट जनरल ध्रृव कटोच यांनी केले.

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे धर्मवीर डॉ. बाळकृष्ण मुंजे स्मृती व्याख्यानमालेत कुसुमाग्रज स्मारकात शनिवारी (दि. १२) पहिले पुष्प गुंफताना ‘डाव्या उग्रवादाची कडवी आव्हाने : नक्षलवाद’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सहकार्यवाह प्रमोद कुलकर्णी, सदस्य स्मृती ठाकूर व्यासपीठावर उपस्थित होते. कटोच म्हणाले की, १९६७ मध्ये प. बंगालमध्ये नक्षलवाद ५० वर्षांपूर्वी उदयास आला. तत्पूर्वी चीनसारख्या देशात नक्षलवादाचा प्रभाव होता. आंध प्रदेश, प. बंगाल या प्रदेशातील अविकसित, दुर्गम भागात नक्षलवाद वाढू लागला आहे. राज्यघटनेने लोकशाही पद्धत स्वीकारली, मात्र लोकशाही व्यवस्था नक्षलवाद मान्यच करत नाही. १९७१ मध्ये इंदिरा गांधी सत्तेत असताना सैन्यदलाच्या बळाचा वापर करून नक्षलवाद संपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र बळाच्या वापरामुळे माणसेच मारली गेली, नक्षलवाद कायमच आहे. देशातील नक्षलवादाचे जाळे देशाच्या प्रगतीसाठी हानिकारक ठरणारे आहेत. आजही देशातील काही भागात राज्यघटनेप्रमाणे नागरिकांना समान वागवले जात नाही. विकासापासून दूर ठेवण्यात येत हे धाेरण बदलून संविधानाप्रमाणे सर्वांना समान वागणूक देण्याची विचारसरणी अवलंबली पाहिजे. देशात नक्षलवाद वाढण्याच्या कारणांपैकी शासकीय धाेरणही प्रमुख कारण आहे. विकास, सुरक्षा अधिकार यांच्या आधारे भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत आदिवासींचे प्रश्न सोडविण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आजपर्यंत नक्षलवादाविरोधातील कारवाईत हजारांच्या वर बळी गेलेे. छत्तीसगड, बिहार, महाराष्ट्रातील काही भाग, प. बंगाल या राज्यांसह ३५ जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद वाढू लागला आहे. ब्रिटिश राजवटीत आदिवासींच्या जमिनी, जंगलाबाबत सरकार हस्तक्षेप करत नव्हते. मात्र, स्वातंत्र्यानंतर बदललेल्या शासकीय धाेरणामुळे सरकारच्या वाढलेल्या हस्तक्षेपामुळे नक्षलवाद वाढत असल्याचे ध्रुव कटोच यांनी याप्रसंगी नमूद केले.
बातम्या आणखी आहेत...