नाशिक- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर नजर ठेवली जात असतानाच गुन्हे शाखा युनिट च्या पथकाला दोन सराईत गुन्हेगारांकडून दोन गावठी कट्टे हस्तगत करण्यात यश आले. निवडणूक काळात हे दोघे गावठी बनावटीचे कट्टे विक्री करणार होते. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पाळत ठेवली जात आहे. शस्त्रबंदी आदेश असल्याने अवैध शस्त्र विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर ‘नजर’ ठेवली जात होती. गुन्हे शाखा युनिट चे स्वप्नील जुंद्रे यांना शहरात दोन संशयित गुन्हेगार दोन गावठी कट्टे विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने शिवाजी उद्यानामागे कान्हेरेवाडी येथे सापळा रचला. बनावट ग्राहकाशी व्यवहार करत असताना पथकाने दोघांना अटक केली. अंगझडतीमध्ये दोन गावठी कट्टे, चार काडतुसे मिळून आली. विशाल दीपक सौदे (रा. महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा), सुरेश राकेश पिंगळे (कोरेनगर, धुळे) अशी नावे संशयितांनी सांगितली.
वरिष्ठ निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख, एन. एन. मोहिते, चंद्रकांत पळशीकर, संजय पाठक, चंद्रकांत सदावर्ते, अनिल दिघोळे, शरद सोनवणे, नीलेश काटकर, विशाल देवरे, शांताराम महाले, अतिष पवार, गणेश वडजे, विजय टेमगर, संदीप भुरे, हर्षल बोरसे यांच्या पथकाने ही कारवाई केली. निवडणुकीच्या काळात शस्त्र विक्री शाेधाची ही पहिलीच मोठी कारवाई ठरली. कारवाईचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल, उपआयुक्त दत्ता कराळे, सहायक आयुक्त सचिन गोरे यांनी अभिनंदन केले.
शस्त्र विक्रीचे आणखी गुन्हे उघड होणार
पकडण्यात आलेल्या धुळे येथील संशयितावर धुळे, जळगाव येथे गुन्हे दाखल आहेत. परराज्यातून गावठी कट्टे विक्रीसाठी येतात. मुख्य संशयित पकडला गेल्याने शस्त्र विक्रीचे आणखी गुन्हे उघडकीस येणार आहेत. -सुभाषचंद्र देशमुख, वरिष्ठ निरीक्षक, युनिट