आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवान, खुदा, गॉड ओवेसीला सद‌्बुद्धी देवो - ग्यानदास यांचा टोला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘ब्रह्मच सृष्टीच्या निर्मितीचा खरा जनक आहे. त्यातूनच सर्वांची उत्पत्ती झाली आहे. त्यामुळे ओवेसी किंवा कोणी काहीही म्हणू दे, त्याने काहीही फरक पडत नाही. वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या ओवेसीला भगवान, खुदा, ईश्वर-गॉड सद्बुद्धी देवो,’ असा टोला अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष ग्यानदास महाराज यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना लगावला.

देशभर धर्मांतरावरून वाद होत असतानाच मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमिनचे (एमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी इस्लामच सर्व धर्मांचे माहेर असल्याचा दावा केला होता. तसेच इतर धर्मीय इस्लाम स्वीकारतील तीच खरी ‘घरवापसी’ होईल, असे वक्तव्य करून नवा वाद उत्पन्न केला.

या वक्तव्यावर बोलताना ग्यानदास महाराज यांनी ओवेसीने त्याबाबत अभ्यास करण्याचा शांतपणे सल्ला दिला. ‘ माझ्या मुसलमान बंधूने इतिहास जाणून घ्यावा. कुराणाचीही माहिती घ्यावी. १४००-१५०० व्या वर्षाचाच इतिहास सापडेल. हिंदू किंवा सनातन धर्माचे तसे नाही. त्यापूर्वीचा त्यास इतिहास आहे. त्यामुळे कोण काय म्हणतंय याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. आम्ही प्रत्येक ठिकाणी ईश्वर आहे असेच मानतो. शिवाय जो प्रामाणिक आहे, ज्याची बुद्धी स्वच्छ आहे, ज्याचे आचरण स्वच्छ आहे, जो सर्व सहन करण्याची क्षमतो ठेवतो (जिसका इमान सच्चा हो, जिसकी बुद्धी स्वच्छ हो, जिसका आचरण स्वच्छ हो) तोच खरा मुसलमान आहे,’ असे सांगत ग्यानदास महाराजांनी त्यावर अधिक बोलणे टाळले.