आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झंझावाती वार्‍यासह गारांचा वर्षाव; 70 झाडे उन्‍मळली, पत्र्याचे शेडही कोसळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक/नाशिकरोड - शहर व परिसरात मंगळवारी दुपारी 1.45 वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह मध्यम स्वरूपाचा गारांसह सुमारे अर्धा तास पाऊस पडला. 12 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहरात दोन ते चार किलोमीटर प्रतितास वाहणार्‍या वार्‍याचा वेग ताशी 30 किलोमीटर झाल्याने शहरात 70 ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, तर चार ठिकाणी पत्र्याच्या शेडसह फलक पडले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन अधिकार्‍यांनी सांगितले.
दक्षिण ओडिशा व उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीलगतच्या बंगालच्या उपसागरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र ओडिशाची दक्षिण किनारपट्टी आणि परिसरावर आहे. त्याचा परिणाम म्हणून वार्‍याच्या वेगातही वाढ झाली आहे. मंगळवारी शहरात अचानक आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातल्याने व्यावसायिकांचे हाल झाले. तसेच वार्‍याचा वेग जास्त असल्याने संदर्भ रुग्णालय येथील पत्र्याचे शेड कोसळले, तर पखालरोडवरील सागर सम्राट, जुनी पंडित कॉलनी, जिल्हाधिकारी कार्यालय, आयुक्तालय, तसेच जिल्हाधिकार्‍यांच्या बंगल्याच्या परिसरात, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड, पाथर्डी, वडनेर दुमाला, विल्होळी, पिंपळगाव खांब, गायकवाड मळा, जेलरोड, पंचक या परिसरात वृक्ष उन्मळून पडले.

जोरदार वार्‍यामुळे वृक्षांच्या फांद्या व हिरवी पाने ठिकठिकाणी पडल्याने शहरातील रस्ते हिरवेगार झाले होते. वार्‍याचा वेग वाढल्याने महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला. यामुळे शहराच्या अध्र्याहून अधिक भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरवासीयांची गैरसोय झाली. पावसामुळे काळोख पसरल्याने वाहनचालकांना दिवसाही वाहनांचे दिवे सुरू ठेवावे लागत होते. लहान मुलांनी भरपावसात गारा वेचण्याचा आनंद लुटला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शासकीय कन्या विद्यालयात झाडावरील पडलेल्या कैर्‍या वेचण्याचा आनंद बालकांनी लुटला. पावसानंतर रस्त्यावर चिखल आणि वृक्षांच्या फांद्या पडल्याने अपघातात वाढ झाली होती. चांडक सर्कल येथे किमान पाच दुचाकीस्वार घसरून पडले.
पाणीपुरवठा आज कमी दाबाने
वादळी पावसामुळे शहराच्या अध्र्याहून अधिक भागात दुपारपासूनच वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे बहुतांश ठिकाणी जलकुंभात पाणी भरण्यात व्यत्यय आल्याने मंगळवारी सायंकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. बुधवारी सकाळी अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
नाशिकरोडला वृक्ष कोसळून वाहनांचे असे नुकसान झाले.
महापौरांकडून पाहणी
वादळी पावसाने शहरात दाणादाण उडविल्याने महापौर अँड. यतिन वाघ यांनी शहरातील प्रमुख भागांची पाहणी केली. या वेळी रस्त्यावर ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला रस्त्यावरील वृक्ष हटविण्याची सूचना केली. त्यानुसार हे वृक्ष हटविल्यानंतर रहदारी सुरळीत झाली. नाले सफाई करावी व धोकेदायक वृक्ष काढून घेण्याचे आदेशही त्यांनी दिले.

पंचवटी : पंचवटी परिसरातील अनेक वृक्ष उन्मळून पडले. ढोबळी मिरचीचे उत्पन्न ज्यात घेतले जाते ते सेडनेट उडून गेले. शेकडो एकरवरील मका जमीनदोस्त झाला. टाकळीरोडवरील जयशंकर गार्डन या मंगल कार्यालयाच्या पत्र्यांची गारांमुळे चाळणी झाली. विडीकामगारनगरमधील क्रिकेट अकादमी कार्यालयाचे पत्रे शंभर फूट अंतरावर येऊन पडले. पंचवटी कारंजा, राजापाल कॉलनी, पालिका विभागीय कार्यालय, हिरावाडी, के. के. वाघ महाविद्यालय आदी ठिकाणी वृक्ष कोसळले.

आडगाव परिसर : आडगाव परिसरात वार्‍यामुळे घरांचे पत्रे आणि शेडनेट व विजेचे खांब उन्मळून पडले. वीजपुरवठा खंडित झाला. वीज कंपनीचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाल्याचे उपकार्यकारी अभियंता अरविंद जोंधळे यांनी सांगितले. राहुल माळोदे यांचे सिमला मिरचीचे शेड कोसळले.

गंगापूररोड : येथील कॉलनी परिसरातील मोठे वृक्ष उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान झाले. वार्‍यामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण झाला. गंगापूररोडवर डोंगरे वसतिगृहाच्या मैदानाजवळील दोन वृक्ष कोसळले.

जेलरोड परिसरात लिफ्टमध्ये अडकली दोन मुले
वीजपुरवठा खंडित झाल्याने दुपारच्या सुमारास जेलरोडवरील इच्छामणी दर्शन या इमारतीतील (शिवाजीनगर परिसर) लिफ्टमध्ये अपूर्व निकम (13) व सुरज राठोड (10) पहिल्या मजल्यावर अडकले होते. मुलांचा रडण्याचा आवाज आल्याने काही नागरिकांनी अग्निशमन दलाला ही माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन जवानांनी घटनास्थळी जाऊन या मुलांची सुटका केली.

वाहनधारकांनी शोधली रस्त्यावरील पाण्यातून वाट
स्टेट बँक चौक, सोनवणेनगर, उत्तमनगर, शिवाजी चौक, भुजबळ फार्म, इंदिरानगर, कलानगर, वडाळा-पाथर्डीरोड आदी भागांतील रस्त्यावर पाणी साचले होते. पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचल्याने पालिकेने केलेल्या रस्त्याच्या कामाचा अनुभव नागरिकांनी घेतला.
शहराच्या अध्र्याहून अधिक भागात वीजपुरवडा खंडित
शहराच्या विविध भागात वृक्ष विजेच्या खांबावर कोसळल्याने वीज तारा तुटल्या. त्यामुळे शहराच्या अध्र्याहून अधिक भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. सिडको, इंदिरानगर, अंबड डीजीपीनगर, कामटवाडे, खुटवडनगर भागात गारा पडल्या. अंबड, पिंपळगाव, विल्होळी, पाथर्डी भागात कांदा, गहू व इतर पिकांचे नुकसान झाले, तर लेखानगर, भुजबळ फार्म सर्व्हिसरोडवर वृक्ष कोसळले.

जुने नाशिक : जुने नाशिकसह वडाळागाव, नागजी हॉस्पिटल परिसर, द्वारका, शालिमार परिसरात वृक्ष कोसळल्याने अनेक गाड्यांचे नुकसान झाले. खडकाळी भागातील शुक्रल्ला शाहबाबा चौक येथे मोठा वृक्ष कोसळला. शालिमार परिसरातील जाहिरात फलक पडले. दूधबाजारात ड्रेनेजमध्ये कचरा अडकल्यामुळे याठिकाणी पाणी तुंबले होते. नागजी हॉस्पिटल व रेणुकानगर परिसरात काही सोसायटीतील वृक्षांच्या फांद्या कोसळल्या. काझीगढी परिसराचा एक मोठा भाग कोसळला.