नाशिक/ सोलापूर/ जळगाव/औरंगाबाद - राज्यातील सुमारे १९ हजारांहून अधिक गावे आधीच दुष्काळाने होरपळली असताना अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या रुपाने महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढवले आहे. एका बाजूला विदर्भ आणि मराठवाड्यात पाण्याअभावी
शेतीतील पीक करपून गेले, तर उत्तर महाराष्ट्रात अवकाळी गारपिटीच्या तडाख्यामुळे शेतकरी आणि बागायतदारांचा तर ढगाळ वातावरणामुळे मराठवाड्यातील शेतक-यांचा धीर सुटला आहे.
गेल्या दोन दिवसांत आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतक-याला अक्षरश: उद्ध्वस्त केले. नाशिक, जळगाव, धुळे व सोलापूर जिल्ह्याला या नैसर्गिक तांडवाचा मोठा फटका बसला. द्राक्ष, डाळिंबाच्या बागांवर अक्षरश: नांगर फिरला तर कांदा, कापूस या नगदी पिकांचेही मोठे नुकसान झाले. मराठवाड्यातही औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात
अवकाळी पाऊस झाला. ढगाळ वातावरणामुळे मराठवाड्यातील गहू, हरभरा, कापूस आणि आंबा पिकावर संकट ओढवले आहे.
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या गारपिटीने नाशिक जिल्ह्यातील ५, ७६६ शेतक-यांचे १६ हजार ७४७ हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. शुक्रवारी पुन्हा पाच तालुक्यांना गारपिटीचा तडाखा बसल्याने द्राक्ष, डाळिंब, कांदा, कापूस, मिरची, शेवगा, ऊस आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. या दोन दिवसांत अंदाजे ३० हजार हेक्टरवरील पिके जमिनदोस्त झाली. गारपिटीच्या तडाख्यात शेळ्या, मेंढ्या, चिमण्या व कोंबड्यांचाही बळी गेला आहे. अनेक ठिकाणी तर घरांचे
छपरही उडाले.
नाशिक जिल्ह्यातील निफाड, नांदगाव, येवला, मालेगाव, देवळा, सटाणा या तालुक्यांना गारपीट आणि अवकाळी पावसाने गुरुवारीच तडाखा दिला. शुक्रवारी चांदवड, सटाणा, मालेगाव, दिंडोरी, सिन्नर या तालुक्यांत गारपीट झाल्याने उन्हाळ कांदा, द्राक्ष, डाळिंब, कापूस, शेवगा, ऊस, मका, हिरवी मिरची, ढोबळी मिरची आणि भाजीपाल्याचे नुकसान झाले.
अवकाळी पावसाने सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारंचेही मोठे नुकसान झाले. धुळे, जळगाव जिल्ह्यातही शुक्रवारी सुमारे तास- दीडतास जोरदार पाऊस झाला. बोधवड तालुक्यातील जामटी या गावात गारपीट झाल्याने या भागातील पिकांचे नुकसान झाले. या दोन्ही जिल्ह्यातील कांदा, मका, गहू, कापूस हे
पीके अक्षरश: मातीमोल झाली.
कोकणात आंब्याचा मोहोर येण्याच्या काळातच अवकाळी पाऊस आल्याने फळाच्या उत्पादन आणि दर्जावर परिणाम होण्याच्या भितीने उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आंबा बागायतदारांनी लाखो रुपयांची केलेली औषध फवारणी वाया गेली आहे. देवगडमधील आंबा बागा पूर्णपणे मोहरल्या होत्या पण वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे मोहोर
गळून पडला आहे.
थंडी गायब, रब्बीवर संकट: नोव्हेंबर महिना थंडीची वाट पाहण्यात गेला. आता हलक्या पावलांनी थंडीचे आगमन होऊ लागले. मात्र ढगाळ हवामानाने थंडी गायब झाल्याने मराठवाड्यातील गहू, हरभरा, आंबा पिके संकटात सापडली आहेत.
औरंगाबादेतही फटका
अौरंगाबाद जिल्ह्यातही काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे रब्बी बरोबरच केशर आंब्याचे पिक धोक्यात आले.
तीन दिवस धोका : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र असल्याने आणखी दोन- तीन दिवस पावसाळी वातावरण राहील. येत्या ४८ तासात मध्य महाराष्ट्रासह मराठवाडयात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.
पुढे वाचा ... गारांचा खच
गारांचा खच
नाशक जिल्ह्यातील सहा तालुक्यात ठिकठिकाणी पडलेला गारांचा खच २४ तास उलटूनही वितळला नव्हता.
२०० ट्रक कांदा भिजला
सोलापूर बाजार समितीमधील दोनशे ट्रक म्हणजेच ३ हजार ६०० टन कांदा पावसात भिजल्याने कांदा शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कांद्याच्या दरावरही त्याचा परिणाम दिसून आला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
नुकसान
4873 डाळिंब
9514 कांदा
1333 द्राक्षे (हेक्टरमध्ये)