आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hailstorm Relief News In Marathi, Nashik Revenue Division, Divya Marathi

गारपीटग्रस्तांसाठी मदत, नाशिक विभागाला 80 कोटींचा पहिला हप्ता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - नाशिक विभागात फेब्रुवारी व मार्चमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे पिके, फळबागांसह जीवितहानी झाली. उभी पिके उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला. शेतकर्‍यांना दिलासा देऊन पुन्हा सन्मानाने उभे करण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या विशेष पॅकेजमधील नाशिक विभागासाठीचा 80 कोटी रुपयांचा पहिला हप्ता उपलब्ध झाला आहे. शेतकर्‍यांच्या बँक खात्यांत दोन दिवसांनी हा निधी जमा होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नैसर्गिक आपत्तीचा फटका नाशिकसह राज्यातील 28 जिल्ह्यांतील शेतकर्‍यांना बसला होता. शासनाने शेतकर्‍यांच्या मदतीसाठी विशेष पॅकेजची घोषणा केली होती. त्यानुसार, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीसाठी पहिल्या टप्प्यात 540 कोटी रुपयांचा पहिला हप्ता औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर व अमरावती विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. नाशिक विभागासाठी 80 कोटींचा पहिला हप्ता आला असून, विभागाने पाच जिल्हाधिकारी कार्यालयांकडे 20 ते 25 कोटी रुपये या प्रमाणात तो वर्ग केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात शुक्रवारी हा निधी वर्ग होणार आहे. निधीचे वाटप निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार होणार असून, नुकसानीची तीव्रता व उपलब्ध निधीचा प्राधान्यक्रम ठरविण्यात येत आहे.

दोन दिवसांत निधी जमा होणार
विभागासाठी पहिल्या टप्प्यातील 80 कोटींचा निधी मिळाला असून, प्रत्येक जिल्ह्यात प्रमाणानुसार तो वर्ग केला आहे. नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात निधी जमा होण्याची प्रक्रिया दोन दिवसांत होईल.
सतीश देशमुख, महसूल उपायुक्त, नाशिक विभाग