आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिद्द शिक्षणाची: अपंग रिझवानचे स्वप्न आकाश भरारीचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- वय वर्षे 22; पण उंची केवळ अडीच फूट. म्हटले तर बाबागाडीत बसलेले बालक; पण प्रतिभा असाधारण. संगणक लीलया हाताळणारा रिझवान नुकताच दहावी परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. आता त्याला बनायचंय संगणक अभियंता. पण स्वप्नांच्या पंखांना बळ हवंय पैशांचं.

जन्मत:च आलेले अपंगत्व. दैवाने अधू केलेले पाय. त्यामुळे एखाद्या बालकासमान बाबागाडीतच आयुष्य कंठणे वाट्याला आलेले. त्यातच जन्मदात्याने वार्‍यावर सोडलेले; पण अशाही अवस्थेत जगण्याचीच नव्हे तर शिकण्याचीही जिद्द दाखवत रिझवान आता एका नव्या स्वप्नाला गवसणी घालायला निघाला आहे. दहावीला 70 टक्के गुण त्याने मिळविले आहेत. रिझवान संगणक अभियंता बनण्याचे स्वप्न तर बघतोय, पण. त्याला कॉलेजच्या अँडमिशनसाठी तब्बल 50 हजारांची गरज आहे. आतापर्यंतचे आयुष्य मामाकडे कंठणार्‍या रिजवानला या पुढील काळात त्यांच्यावर बोझा बनायचे नाही. त्याला प्रतीक्षा आहे एखाद्या मसिहाची..

गुजरातमधून नाशिकला स्थायिक झालेल्या सलमा शेख यांचा रिझवान एकुलता एक मुलगा. जन्मत:च अपंगत्व असलेल्या या मुलाचे संगोपन करण्यास नकार देत वडिलांनी दोघांनाही सोडून दिले. सामान्य शाळेत प्रवेश मिळत नसल्याने नाराज झालेल्या सलमा शेख यांनी कॅनडा कॉर्नरवरील व्ही. एन. नाईक हिंदी माध्यमिक शाळेत प्रवेशासाठी प्रयत्न केला असता तेथे त्याला प्रवेश मिळाला. सातवीपासून या शाळेत शिकणार्‍या रिझवानने दहावीत 70 टक्के गुण मिळवून व्यवस्थापनाचा निर्णय अगदी योग्य ठरवला आहे.

गुणी रिझवान
रिझवानची आकलनशक्ती प्रचंड आहे. चित्रकलेत अनेक परितोषिकेही त्याने मिळवली आहेत. राष्ट्रपती, लोकसभा सभापती, उपराष्ट्रपती यांच्यासह अनेक मान्यवरांच्या कौतुकास तो पात्र ठरला आहे. गायन-वादनाचीही आवड असलेला रिझवान संगणकावर विविध कामे करतो.

आम्ही भाग्यवान..
अपंग रिझवानचा सांभाळ करताना नैराश्याने स्पर्शही केला नाही. उलट, अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्या या बालकाच्या संगोपनासाठी आमची निवड केल्याबद्दल आम्ही अल्लाहचे आभार मानतो.
-सलमा शेख, रिझवानची आई