आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रवणावाचूनही जुळले सारे गुणवत्तेचे सूर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमित, सुमित)
नाशिक- जन्मत:च आलेल्या कर्णबधिरत्वाने खचून जाता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर नाशिकमधील दहा विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचा निडरपणे सामना करीत सर्वसामान्य विद्यार्थ्यांना लाजवेल असे घवघवीत यश संपादन केले. या प्रत्येक विद्यार्थ्याची कहाणी वेगळी आहे.
विशेष शिक्षिकांना सलाम!
महाराष्ट्र समाजसेवा संघ संचलित रचना विद्यालयात अपंग एकात्म शिक्षण योजनेद्वारे कर्णबधिर विद्यार्थ्यांना आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. सातवीपर्यंत माई लेले श्रवण विकास विद्यालयात अथवा अन्य तत्सम शाळेत शिकवले जाते. त्यानंतर ‘रचना’त प्रवेश मिळतो. नीता घरत आणि मीनाक्षी बागल या विशेष शिक्षिका या विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करतात. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्याचेही बहुमूल्य शिक्षण त्यांना देतात. हे विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर त्याच आत्मविश्वासाने घेतात.
अमित, सुमित या जुळ्या भावांची जिद्द
अमित सुमित नेवकर जुळी भावंडे. तीन मुलींच्या पाठीवर त्यांचा जन्म झाला. जन्मत:च कावीळ झाल्याचे सांगून डॉक्टरांनी रक्त बदलले. परिणामी, दोघांनाही कायमस्वरूपी कर्णबधिरत्व आल्याचे त्यांचे वडील दत्तात्रय नेवकर यांनी सांगितले. नेवकर नोट प्रेसमध्ये काम करतात. त्यांनी दाेघांना चांगले शिक्षण देण्याचा विडा उचलला. अमित-सुमितनेही जिद्दीने अभ्यास केला. दहावी परीक्षेत अमितला ७४, तर सुमितला ७३.७ टक्के गुण मिळाले.
शाळेत नेहमीच अव्वल येणारा हनुमान
हनुमान हुरकर. दहावीच्या परीक्षेत ७३.५ टक्के गुण. लहानपणा-पासूनच हनुमान वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. यंदा मात्र तो दहावीचा तणाव झेलू शकला नाही. परिणामी, अभ्यास करताना नैराश्याने ग्रासले. म्हणून टक्के कमी पडल्याचे हनुमान सांगताे. त्याचे वडील अंबड एमआयडीसीत कार्यरत आहेत.
एकमेव कर्णबधिर विद्यार्थिनी नेहा
नेहा खोडे. दहावीत ८३ टक्के गुण. रचना विद्यालयातील १३ कर्णबधिर विद्यार्थ्यांमधील ती एकमेव विद्यार्थिनी. शाळेत जाईपर्यंत नेहा कर्णबधिर असल्याची शंकाही आई-बाबांना आली नाही. थोडेफार बोबडे बोल ओठी असल्याने तिला सर्वसामान्य मुलांच्या बालवाडीत प्रवेश देण्यात आला. परंतु, शिक्षकांच्या ती कर्णबधिर असल्याचे लक्षात आले. नेहाने दररोज चार तास अभ्यास करीत कर्णबधिर विद्यार्थ्यांमध्ये सवलतीचा विषय घेऊन सर्वाधिक गुण मिळविले. तिचे वडील शेतकरी.
राेहितचे संपूर्ण कुटुंबच कर्णबधिर
रोहित पवार... ७९.२० टक्के गुण. रोहितसह त्याचे आई, वडील आणि बहीण हे सर्वच कर्णबधिर आहेत. जन्मत:च आलेल्या कर्णबधिरत्वाचा बाऊ करता रोहित प्रामाणिकपणे अभ्यास करीत राहिला. त्याचे फळ त्याला चांगल्या गुणांच्या रूपाने मिळाले. रोहितचे वडील राजेंद्र पवार इंडियन एअरफोर्समध्ये कार्यरत आहेत. मोठा अधिकारी होण्याचे रोहितचे स्वप्न आहे.
आम्हीदेखील दहावीचे गुणवंतच...
‘रचना’मधील वैभव बापूसाहेब जाधव या कर्णबधिर विद्यार्थ्याला इंग्रजी विषयासह ६७ टक्के गुण मिळाले. तर, सवलतीच्या विषयांचा लाभ घेऊन स्वप्नील पद्माकर जोशीने ७८.२०, सागर राजेंद्र सातकरने ७६, रतन दिगंबर शिंगाडेने ७४, तर मयूर चंद्रशेखर रघुवंशीने ६३ टक्के गुण मिळवले.