आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोकादायक रंगांमुळे आरोग्य बेरंग, अाराेग्यास घातक रंगांची शहरात उघड विक्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध बाजारपेठांत वेगवेगळ्या रंगांची दुकाने थाटण्यात आली आहेत. या दुकानांत पाहणी केली असता अनेक दुकानदारांकडे रासायनिक अन‌् धाेकादायक रंगांची उघड व्रिकी सुरू असून, नागरिकांच्या आरोग्याबरोबरच खेळ सुरू अाहे. विशेष म्हणजे, या रंगांच्या विक्रीबाबत अनेक दुकानदारांना नियम माहीत नाहीत, परंतु पालिका प्रशासन अाणि अन्न व अाैषध प्रशासन विभागदेखील कारवाईबाबत अनभिज्ञच असल्याचे समाेर अाले अाहे. अशा प्रकारच्या धाेकादायक रंगांच्या निर्मितीसाठी व विक्रीसाठी नेमकी काय नियमावली अाहे, याबाबत ‌खुद्द प्रशासनच अालबेल असल्याने अाराेग्याला बेरंग करणारा हा सर्व प्रकार सुरू अाहे. त्यावर ‘डी. बी. स्टार’ने टाकलेला हा प्रकाशझोत...
 

तरुणाईच्या सेलिब्रेशनसाठी सर्वाधिक उत्सुकतेचा सण म्हणजे रंगपंचमी. या उत्सवासाठी विविध प्रकारच्या रंगांची दुकाने शहरभरात थाटण्यात अाली अाहेत. मेनरोड, शालिमार, कॉलेजरोड, गंगापूररोड, सिडको, सातपूर अशा सर्वच परिसरात साधारण रंगांसह रासायनिक रंगांची विक्री सुरू अाहे. मात्र, काही रंग हे अाराेग्य, त्वचेला अत्यंत हानिकारण असतात. तरीदेखील त्यांची उघड विक्री हाेताना दिसून येत अाहे. 
 
विशेष म्हणजे, काही रासायनिक रंगांच्या डब्यांवर नियमानुसार ते तयार करण्यासाठी वापरण्यात अालेले पदार्थ, त्याची सविस्तर माहिती अादी तपशील  नमूद करणे गरजेचे असताना प्रत्यक्षात तसा कुठलाही तपशील दिलेला नसल्याचा धक्कादायक प्रकार ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत उघड झाला अाहे. अशा रंगांच्या विक्रीवर पालिका प्रशासनासह अन्न व अाैषध प्रशासनातील अधिकाऱ्यांकडूनही कारवाई हाेत नसल्याचे अाश्चर्य व्यक्त हाेत अाहे. या रंगाचे प्रकार कॉस्मेटिक वा केमिकल प्रकारात मोडत नसल्याने या विरोधात कोणत्या कायद्यांतर्गत तपासणी करावी अथवा कारवाई करावी, असा प्रश्न अन्न व औषध प्रशासन विभागाच्या समाेर निर्माण झाला असून, नागरिकांच्या अाराेग्याला मात्र या प्रकारामुळे प्रचंड हानी पाेहाेचत अाहे. अाधीच अपुऱ्या मनुष्यबळाचेे रडगाणे गाणाऱ्या अन्न व औषध प्रशासनासमोर अनेक अडचणी असताना अाता बाजारात खुलेआम विक्री हाेणाऱ्या या रासायनिक रंगांमुळे अाणखी अाव्हान उभे ठाकले असल्याचे दिसून येते.

बाजारात या नावाने रासायनिक रंगांची विक्री
गाेल्डन कलर, दरबार रंग, साेना-चांदी अशा काही सांकेतिक नावांसह विविध नावांनी रासायनिक रंग बाजारात विक्रीसाठी उपलब्ध अाहेत. या घातक रंगांच्या वापरामुळे त्वचा, डोळ्यांना गंभीर इजा हाेण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे त्याचा वापर टाळणे गरजेचे असून, त्यांच्या विक्रीवरही बंधन अाणणे तितकेच गरजेचे अाहे. परंतु, प्रत्यक्षात काेणत्या नियमांतर्गत अशा रंगांच्या विक्रीवर वा उत्पादनांवर कारवाई करावी, याचा अद्याप अाैषध प्रशासन अधिकारी विचारच करीत असल्याचे निदर्शनास अाले अाहे.

कोणीही या, धाेकादायक रंग विक्रीची दुकाने थाटा..
शहरात कोणत्याही प्रकारचा व्यवसाय थाटायचा असल्यास वा कोणत्याही पदार्थांची विक्री करावयाची असल्यास त्याबाबत महापालिका प्रशासनाची वा संबंधित विभागाची परवानगी घेणे कायद्याने बंधनकारक असते. असे असताना कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता शहरात अनेक ठिकाणी रंग विक्रीची दुकाने थाटण्यात आली असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत दिसून अाले अाहे. बहुतांश दुकानदारांकडून धाेकादायक रासायनिक रंगांची उघड विक्री सुरू आहे. या दुकानदारांकडून कोणत्या प्रकारच्या रंगांची विक्री होते, हे रंग विक्रीसाठी कोठून आणले आहेत, त्यात कोणत्या पदार्थांचा समावेश आहे, ते अाराेग्याला हानिकारण अाहेत का, याबाबत कोणत्या विभागाने तपासणी करावी, हेच निश्चित नसल्याने सर्रास अाराेग्य बेरंग करण्याचा बाजार मांडलेला दिसून येताे.

पोलिस प्रशासनाचीही लागणार कसाेटी...
रासायनिक रंगांनी भरलेले पाण्याचे फुगे वाहनांवर फेकण्याचे व वाहनधारकांना लुटण्याचे प्रकार या उत्सवादरम्यान शहरात अनेक ठिकाणी सर्रास घडतात. अशा फुग्यांतील रंगांमुळे वाहनांना अपघात होण्याचे प्रकारदेखील अनेकदा घडले अाहेत. याहून धोकादायक बाब म्हणजे रासायनिक रंगांचे हे पाणी डाेळ्यात जाऊन तात्पुरते अन‌् बहुतांश वेळा कायमस्वरूपी अंधत्व आल्याचेही गंभीर प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामुळे असे प्रकार राेखण्यासाठी अाता पोलिस प्रशासनाचीही कसाेटी लागणार अाहे. उत्सवाला गालबाेट लागू नये याबराेबरच अशा घातक रंगांचा वापर हाेऊ नये, यासाठी पाेलिस प्रशासनालाही सजग राहावे लागणार अाहे.

रासायनिक रंग घातकच...
रासायनिक रंगात काॅपर सल्फेटचा माेठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सिल्व्हर रंगात युमिनियम ब्राेमाइड हे कॅन्सरजन्य रासायनिक असते, त्यामुळे त्वचेवरील जखमेस हा रंग लागला तर कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. असे रासायनिक रंग डोळ्यात गेले तर कायमस्वरूपी अंधत्व येण्याचाही धोका असताे. त्वचेसाठीदेखील हे रंग अत्यंत हानिकारण असतात.

थेट प्रश्‍न 
कारवाई करण्यात अनेक अडचणी - भूषण पाटील, सहायक अायुक्त, औषध प्रशासन विभाग
 
{ बाजारात रासायनिक रंगांची उघड व्रिकी केली जात असताना अाराेग्यास घातक अशा रंगांची तपासणी केली जात नाही का?
- रासायनिक रंग हे कॉस्मेटिक वा केमिकल प्रकारात मोडत नाहीत. परिणामी, कायद्यांतर्गत कारवाई करण्यात विभागाला अनेकदा अडचणी येतात.
 
{ अशा रंगांच्या विक्रीसाठी विशिष्ट परवान्याची वा परवानगीची आवश्यकता असते का?
- अशा उत्पादनांच्या विक्रीसाठी परवानगी घेणे गरजेचेच आहे. मात्र, अनेकांकडून ती घेतलीच जात नाही.
 
{ औषध प्रशासन विभागाकडून याबाबत तपासणी हाेते का?
- सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाकडून बाजारात उपलब्ध असलेल्या रासायनिक रंगांचे सॅम्पल जमा करून त्याची तपासणी केली जाते. यापुढेही दुकानांत तपासणी केली जाणारच अाहे.
बातम्या आणखी आहेत...