आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरसूल गाव हळूहळू पूर्वपदावर, शनिवारचा भरला आठवडे बाजार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरसूल - वेळ सकाळी ८.३० वाजेची.. गावाकडे जाणारा रस्ता आणि शिवारात ब-यापैकी शांतता.. अधून-मधून रस्त्यात येणारी गुरे आणि त्यांच्यामागे असलेला गुराखी, अर्थात गावकरीच.. गावात प्रवेश करणा-या रस्त्यांवर पोलिस व्हॅन आणि कर्मचारी.. गावात प्रत्येक चौकाचौकात पोलिसांचे पथक सज्ज.. बाजारपेठेत काही प्रमाणात उघडलेली दुकाने. साजरी झालेली ईद.. १० वाजेनंतर रस्त्यावरही चहल वाढल्याने आता हळूवारपणे हरसूल पूर्वपदावर येत असल्याचं चित्र शनिवारी हरसूल गावात दिसून आलं.

हरसूलमध्ये १५ जुलै रोजी झालेल्या दंगलीमुळे संपूर्ण गावासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकही हादरलेले. घराच्या बाहेर निघणा-यांना किंवा तिकडे जाणा-यांना दगड-गोट्यांचा मार खावा लागत असल्याचं तेथे जाऊन आलेल्यांकडून ऐकायला मिळत होतं. पोलिसांवर झालेला हल्ला आणि त्यानंतर झालेल्या गोळीबारामुळे निर्माण झालेली प्रचंड तणावाची परिस्थिती निवळणार केव्हा? या विचारात स्थानिकांसह सारीच सुरक्षा यंत्रणा होती.
त्यातच पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट आणि त्यानंतर हरसूलशेजारील ठाणापाडा गावात पेटलेली दंगल. यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यातच आला शनिवारचा हरसूलचा बाजार. एरवी सकाळी वाजेपासूनच बाजारपेठ आणि दुकाने उघडली जात असताना १० वाजूनही जवळपास सारंच बंद असल्याने बाजारावरही तणावाचं सावट दिसत होतं. मात्र, पोलिसांचा कडेकोट पहारा असल्याने काही स्थानिकांनी पुढाकार घेत आपली दुकाने उघडण्यास सुरुवात केली.

दुपारी १२ वाजेपर्यंत भाजीपाल्यासह जवळपास निम्मी दुकानेही उघडली. त्यामुळे नागरिकांच्या चहल-पहलने बाजारपेठ नटल्याने आता परिस्थिती नियंत्रणात येण्यास सुरुवातही झाल्याचा विश्वास सा-यांनाच पटला असून, मंगळवारच्या बाजारावरच सारं काही अवलंबून असल्याचं सांगितलं जातंय.

ईद साजरी
दंगलीमुळेयेथील व्यापारी वर्गाने हरसूलमधून पळ काढत नाशिकसह आपल्या नातेवाइकांकडे वास्तव्य केले होते. त्यामुळे सारीच व्यापारी गल्ली जणू तीन-चार दिवस ओस पडली होती. मात्र, पोलिसांचा बंदोबस्त, पालकमंत्र्यांचे दोषींवर कारवाईचे आश्वासन अन् विरोधी पक्षनेत्यांच्या न्यायालयीन चौकशीच्या मागणीमुळे काही प्रमाणात पूर्वपदावर आलेल्या हरसूलमध्ये ईद साजरी झाली. नमाजपठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या एकमेकांना शुभेच्छाही दिल्या.

व्यवहार सुरळीत
हरसूल तसेच ठाणापाडा येथील तणावग्रस्त परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. शनिवारी मोठ्या उत्साहात ईद साजरी करण्यात आली. वाहतूक सेवा पूर्ववत झाली असून, दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत. बाजारपेठेतील दुकाने उघडली आहेत. दूध, भाजीपाला, फळे यांचा पुरवठा सुरळीत झाला आहे. दरम्यान, शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यात हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजयमोहिते, पोलिसअधीक्षक

पोलिस बंदोबस्त कायम
दोनगटांत झालेल्या या दंगलीमुळे आणि त्यानंतर या घटनेचे पडसाद ठाणापाड्यात उमटल्याने केव्हाही काहीही होऊ शकते. यामुळे हरसूलमध्ये पोलिस बंदोबस्त कायम आहे. चौका -चौकात पोलिस व्हॅन उभ्या करण्यात आल्या आहेत. ८०० पोलिस कर्मचारी आणि अधिकारी हरसूल आणि ठाणापाड्यात तैनात करण्यात आले आहेत. त्यात राज्य राखीव दलाच्या चार तुकड्यांचा समावेश आहे. त्यामुळे वातावरण निवळण्यास मदत होत असून, नागरिकांनाही पोलिस बंदोबस्त असल्याने धीर मिळाल्याने त्यांनी घराबाहेर पडण्यास सुरुवात केली आहे.
हरसूल तसेच ठाणापाडा येथील व्यवहार शनिवारी पूर्वपदावर आले. बाजारपेठेतील दुकाने खुली झाल्याचे दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...