आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककरांना गारांसह जोरदार पावसाने झोडपले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक शहरात सोमवारी दुपारपासून ढगाळ वातावरण तयार झाल्याने उकाडा वाढला होता. दुपारी 4.30 वाजेपासून अचानक बेमोसमी पाऊस पडण्यास सुरुवात झाली. या पावसामुळे तारांबळ उडाल्याने पादचारी आसरा घेण्यासाठी धावपळ करीत होते. तर याचवेळी शाळा सुटल्याने विद्यार्थ्यांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला.

यानंतर अचानक गारा पडण्यास सुरुवात झाली आणि बघता बघता जमिनीवर गारांचा सडा पडला. याचदरम्यान शाळा सुटल्याने विद्यार्थ्यांनी गारा खाण्याची तसेच पावसात मस्ती करण्याची संधी सोडली नाही. शहरात सोमवारी दुपारपासूनच ढगाळ वातावरण असल्याने उष्म्यात वाढ झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून हवेतील आद्र्रतेत वाढ झाल्याने पावसाचे वातावरण तयार झाले होते. दुपारी 4.30 वाजेच्या दरम्यान बेमोसमी पावसासह गारा पडायला सुरुवात झाली. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे व्यावसायिकांची व पादचार्‍यांसह दुचाकीस्वारांची चांगलीच तारांबळ उडाली. नाशिक हवामान केंद्रात चार मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. शहरात सिडको, पंचवटी, आडगाव, नाशिकरोड, जुने नाशिक, चांडक सर्कल, गंगापूररोड, मखमलाबाद, दरी, मातोरी या भागात बेमोसमी पाऊस पडल्याने नागरिकांचे हाल झाले. या वेळी जुने नाशिक परिसरातील दूधबाजारात रस्त्याचे काम सुरू असताना ट्रक खड्डय़ात अडकला, तर मोरे मळ्यात एका घरावर झाड पडले. तसेच गोल्फ क्लबवर फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना पावसात भिजत ट्रॅकवर चक्कर मारावे लागले. तर काही जण चालणे अर्धवट सोडून घरी परतले. विल्होळी, सातपूर, देवळालीगाव भागात पावसामुळे क च्च्या विटांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.

नाशिकरोडला वीजपुरवठा खंडित
नाशिकरोड परिसरात दुपारी 4 वाजेपासून सुमारे सव्वा तास विजांच्या कडकडाटांसह वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडला. पावसाला सुरुवात होताच शहरातील वीजपुरवठा जवळपास दीड ते दोन तास खंडित झाला. जोरदार पावसामुळे रस्त्यावर पावसाळ्यातील पावसाप्रमाणे पाण्याचे नाले वाहत होते. अचनाक झालेल्या पावसामुळे झोपडपट्टीधारक, नागरिकांचे हाल झाले. तर बालगोपाळांनी पावसात खेळण्याबरोबर गारा खाण्याचा आनंद लुटला. पावसाळ्यातील कमी पावसामुळे दुष्काळाचा सामना करणार्‍या बळीराजा समोर निसर्गाने आणखी एक संकट उभे केले.अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा तसेच रब्बी पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे.

द्राक्षबागांचे नुकसान
अवकाळी कोसळलेल्या पावसाने आडगाव येथे द्राक्षबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. पंचवटी व आडगाव परिसरात द्राक्ष खुडणी सुरू असून, या पावसाने द्राक्षांसह गहू, हरभरा व अन्य पिकांचे नुकसान झाले. पंचवटीसह आडगाव, विंचूरगवळी, माडसांगवी, म्हसरुळ, शिलापूर, लाखलगाव, मखमलाबाद परिसरात दुपारी अचानक वादळीवार्‍यासह पावसाचे आगमन झाले. अवकाळी पावसाबरोबर गारा पडल्याने परिसरातील द्राक्षबागा, गहू, हरभरा, पालेभाज्यासह अन्य पिकांचे नुकसान झाले. सोसाट्याचा वारा वाहू लागल्याने काही ठिकाणी पाऊस कमी प्रमाणात होता. तर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला होता. यामुळे मखमलाबाद, आडगाव, विंचूरगवळी येथे द्राक्ष खुडणीच्या कामात व्यत्यय आला. पावसापासून चारा वाचवण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ होत होती. सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला होता.

हे उपाय करावे
0 आइस्क्रीम, थंडपेय, उसाचा रस घेऊ नये
0 पाणी उकळून पिण्यास द्यावे
0 लहान मुलांना थंडी लागू नये यासाठी उबदार कपडे परिधान करावे.

आजही पाऊस शक्य
वातावरणात आद्र्रता वाढल्यामुळे पाऊस पडला. तसेच मंगळवारीही ढगाळ व हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
-विजय पाटील, हवामान शास्त्रज्ञ

सर्दी-खोकला वाढणार
श्वसन क्रियेचे आजार वाढून लहान मुले व वृद्धांमध्ये सर्दी-खोकला वाढण्याची शक्यता आहे. तसेच वृद्धांमध्ये दमा वाढतो. पिण्याचे पाणी खराब झाल्याने पोटाचे विकार उद्भवतील.
- डॉ. शिरीष देशपांडे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन