आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पावसाचा नाशिक शहराला तडाखा; 16.6 मिलिमीटर पावसाची नोंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मुख्य हंगामातील पावसाचे दिवस संपत आले असून, परतीच्या पावसास सुरुवात झाली आहे. रविवारी दुपारी नाशिक शहरात मुसळधार पाऊस झाला. या वेळी नागरिकांची तारांबळ उडाली होती.

मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. टपोर्‍या थेंबांच्या या पावसाने दुचाकीस्वारांना चांगलेच झोडपले. उड्डाणपुलावरून जाणार्‍या-येणार्‍या चारचाकींच्या काचांमधून समोरचे काहीच दिसत नव्हते.

आडगाव, पंचवटी, सिडको, पाथर्डी, सातपूर, नाशिकरोड, मेरी, मखमलाबाद, कॉलेजरोड, इंदिरानगर, राणेनगर भागात पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. सुरुवातीला मुसळधार पाऊस पडल्यानंतर बराच वेळ रिमझिम पाऊस सुरू होता. सायंकाळपर्यंत 16.6 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद हवामान केंद्रात झाली.

रस्त्यावरील खड्डय़ांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्डय़ांचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे त्यांचे अतिशय हाल झाले. या खड्डय़ांकडे पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. नाशिक-पुणे महामार्गाची दुरवस्था झाल्याने दुचाकीस्वारांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नाशिकरोड येथील उड्डाणपुलावर पाणी साचल्याने येणार्‍या-जाणार्‍या वाहनांवर पाणी उडत होते. दत्तमंदिर, आर्टिलरी सेंटररोड, बिटको, रेल्वेस्थानक परिसरात पावसामुळे नागरिकांची गैरसोय झाली होती.