Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | havey rain in nashik

नाशिक: मुसळधारेने भात भुईसपाट; द्राक्ष, टोमॅटो, कांदाही पाण्यात

प्रतिनिधी | Update - Oct 11, 2017, 08:37 AM IST

जिल्ह्याला मंगळवारी पावसाने पुन्हा झोडपून काढले. जिल्ह्यात मंगळवारी सरासरी १३ मिलिमीटर पाऊस झाला असून सुरगाण्यात सर्वाधि

 • havey rain in nashik
  नाशिक- जिल्ह्याला मंगळवारी पावसाने पुन्हा झोडपून काढले. जिल्ह्यात मंगळवारी सरासरी १३ मिलिमीटर पाऊस झाला असून सुरगाण्यात सर्वाधिक तर त्यानंतर दिंडोरी, नाशिक, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, चांदवड, पेठसह येवल्याला मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले अाहे. द्राक्ष, टाेमॅटाे, भात कांदा पिकांना माेठा फटका बसला अाहे. इगतपुरीत भात भुईसपाट झाला आहे. शेतात काढून ठेवलेला मका, साेयाबीन भिजले अाहे. दिंडाेरी तालुक्यात नद्या, नाल्यांना पूर अाल्याने १० ते १२ गावांचा संपर्क बराच काळ तुटला हाेता. गंगापूरमधून १७१३ तर दारणातून ११०० क्यूसेकने विसर्ग सुरू होता.

  पावसामुळे द्राक्षबागेच्या कोवळ्या फुटींवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हाेत आहे. सतत पाणी साचत असल्याने द्राक्षबागांतील मुळांचे कार्य थांबून वेलीही सुकत आहेत. नवीन फुटव्यातून निघालेले द्राक्षघड जिरण्याचेही प्रकार घडत आहे.सध्या मका साेयाबीन काढण्याची शेतकऱ्यांची धावपळ सुरू अाहे. त्यातच जाेरदार पाऊस झाल्याने शेतात काढून ठेवलेल्या मका, सोयाबीन पाण्यात भिजले अाहे. लागवड केलेल्या उन्हाळ कांद्यात पाणी साचल्याने कांदा पिक खराब हाेण्याची शेतकऱ्यांना भीती अाहे.

  दिंडाेरी तालुक्यात सलग आठ दिवसांपासून परतीच्या पावसाने कहर केला अाहे. त्यात मंगळवारी (दि. १०) दुपारी वाजेपासून पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जानोरी-मोहाडी रस्त्यावरील बाणगंगा नदीला पूर आल्याने या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. नाशिक- कळवण रस्त्यावरील रनतळ परिसर येथील अाेहाेळाला पाणी आल्याने सुमारे दोन तास वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तर काही वाहनधारकांनी मडकीजांब, इंदोरेमार्गे प्रवास केला. पालखेड येथील वाहळाला पूर आल्याने खडकसुकेणेचा संपर्क तुटला होता. कादवा नदी दुथडी भरून वाहत आहे. परिणामी ओझे करंजवण गावाला जोडणारा तसेच म्हेळुस्के लखमापूरला जोडनारे दोन्ही पुल पाण्याखाली असून ओझे गावाचा करंजवणशी संपर्क तुटला आहे. तर म्हेळुस्केचा लखमापूरशी संपर्क तुटला आहे.

  दिंडोरीच्या पश्चिम भागात गेल्या पाच-सहा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून द्राक्ष, सोयाबीन आदी पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान होत आहे. बहुतांशी पिके पिवळी पडू लागली आहेत. मोहाडी,जानोरी येथील पॉलीहाउसधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसामुळे चांदवड तालुक्याने सरासरी ओलांडली आहे. सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने शहर परिसरात मंगळवारी दुपारी एक तास जोरदार हजेरी लावली. त्यात सुमारे अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ठिकठिकाणी शेतांमध्ये पाणी साचले असून शेतात कापून पडलेला मका, सोयाबीन, टोमॅटो, भाजीपाला, बाजरी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सततच्या पावसामुळे उन्हाळ कांद्याच्या रोपांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा पाऊस खरीप पिकांना नुकसानकारक तर रब्बीसाठी लाभदायक मानला जात आहे.

  द्राक्ष, टोमॅटो, सोयाबीनला फटका
  जिल्ह्यात गत चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधारेमुळे निफाड, चांदवड, येवला, चांदवड आणि दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष, टोमॅटो, सोयाबीन आणि कांद्याचे मोठेे नुकसान होत आहे. औषध फवारणी तसेच खतांसाठी आर्थिक फटका बसत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १८ हजार ३७४ मिलीमीटर पाऊस पडला आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, पेठ, सुरगाणा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. द्राक्षांची आॅक्टोबर छाटणी काही ठिकाणी सुरू आहे. साधारणत: द्राक्षाच्या एका वेलीला १०० घड येतात. परंतु, पावसाच्या फटक्यामुळे ते घटून २५ ते ३० वर येणार आहेत.
  जिल्ह्यात १३ मिलीमीटर पाऊस
  नाशिक२३.०, इगतपुरी ९.६, त्र्यंबकेश्वर १७.०, दिंडोरी २७.०, पेठ १४.०, निफाड ६.२, सिन्नर २२.०, चांदवड १७.४, देवळा १.०, येवला १२.०, बागलाण ७.४, कळवण ८.०, सुरगाणा ४०.० (एकूण २०४ मिलीमीटर)

  आश्रमशाळेजवळ वीज पडली, 3 विद्यार्थी घाबरल्याने रुग्णालयात
  चिंचवड(ता. त्र्यंबकेश्वर) येथील अनुदानित आश्रमशाळेशेजारी मंगळवारी वीज कोसळली. वीजेचा लख्ख प्रकाश पाहून नववीतील महेश नामदेव चौधरी (वय १५, रा. निरघुडे), विमल सदू खणजोडे (वय १५, रा. वरसविहीर) आणि दहावीतील प्रवीण हरी घाटळ (वय १५, रा. जातेगाव) हे घाबरल्याने यांना खबरदारी म्हणून हरसूल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना कुठलीही इजा झाली नसून, त्यांंच्यासोबत आश्रमशाळेचे अधीक्षक आणि मुख्याध्यापक आहेत, अशी माहिती तहसीलदार महेंद्र पवार यांनी दिली.
 • havey rain in nashik
 • havey rain in nashik
 • havey rain in nashik

Trending