आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य : शहरामध्ये सर्रास पिकतोय ‘कार्बाइटचा आंबा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शरदचंद्र पवार मार्केटमध्ये दीड महिन्यापूर्वी अन्न - औषध प्रशासनाने छापा टाकून जप्त केलेला आंबा कार्बाइटद्वारे पिकविला गेल्याचे प्रयोगशाळेतील तपासणीनंतर सिद्ध झाले आहे. या प्रकरणी संबंधित व्यापार्‍याविरुद्ध अन्न सुरक्षा मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे, शहरात ठिकठिकाणी आंबे पिकविण्यासाठी सर्रास कार्बाइटचा वापर केला जात असताना प्रशासन डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे.

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात प्रशासनाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात सुमारे 1400 किलो आंबे आणि दोन किलो कार्बाइट जप्त करण्यात आले होते. पथकाने आंब्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवत उर्वरित माल नष्ट केला होता. या कारवाईत पथकाने जागेवरच कार्बाइट पकडले असतानाही प्रयोगशाळेतील तपासणी अहवालानंतरच कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. अन्न सुरक्षा व मानके या नवीन कायद्यातील तरतुदीनुसार 14 दिवसांत अहवाल मिळणे अपेक्षित असताना महिन्याभरानंतर हा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालात आंबे अनैसर्गिक प्रक्रियेद्वारे पिकविण्यासाठी कार्बाइटचा वापर केल्याचे सिद्ध झाले आहे. आरोग्यास अपायकारक असलेल्या कार्बाइटचा दररोजच्या आहारात समावेश झाल्यास कर्करोगासारख्या आजाराची लागण होण्याची आणि लहान मुलांच्या दृष्टीवरही विपरित परिणाम होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. हेच प्रशासन त्याबद्दल एवढे बेफिकीर का, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.


कायदेशीर प्रक्रियेस प्रारंभ
पंचवटीतील व्यापार्‍याकडे सापडलेल्या फळांचा साठा पिकविण्यासाठी कार्बाइटचा वापर केल्याचे प्रयोगशाळेतील अहवालाद्वारे सिद्ध झाले आहे. त्यामुळे संबंधित व्यापार्‍याविरुद्ध नव्या कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अंतिम कारवाईसाठी आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शहरात असा प्रकार आढळल्यास तत्काळ अन्न-औषध प्रशासनाकडे तक्रार करावी. चंद्रकांत पवार, सहआयुक्त, अन्न-औषध प्रशासन