नाशिक- इंदिरानगर येथील प्रभाग क्रमांक 53 च्या नगरसेविका अर्चना जाधव यांच्यातर्फे प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व महिलांना राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ मिळावा, या उद्देशाने हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले.
किशोरनगर येथील कार्यालयाच्या आवारात आयोजित कार्यक्रमात प्रभागातील शेकडो नागरिकांना हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले. या वेळी अर्चना जाधव म्हणाल्या, की सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती असून, आरोग्याविषयी सर्वांनी जागरूक राहून काळजी घेतली पाहिजे. गरीब व आर्थिकदृष्ट्या हलाखीच्या कुटुंबीयांना मोफत, तसेच सवलतीच्या दरात उपचार घेता यावेत, या उद्देशाने शासनाने सुरू केलेल्या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. किशोरनगर येथे आकांक्षा सामाजिक संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेल्या सेतू कार्यालयात आरोग्यपत्र तयार करून प्रभागातील 222 नागरिकांना त्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी आकांक्षा संस्थेचे संस्थापक संजय जाधव, चंद्रकांत शिंपी, हौसाताई खराडे, वसंत हिंगे, संजय वाघ, आप्पा धोंगडे आदी उपस्थित होते.
वंचितांनी अर्ज करावेत
पैशांअभावी गरिबांना उपचार घेताना तारेवरची कसरत करावी लागते. शासनाच्या योजनेचा नागरिकांनी लाभ घेण्याची गरज आहे. त्यासाठी हेल्थ कार्ड आवश्यक असल्याने ते दिले जात आहे. ज्यांना हे कार्ड मिळालेले नाही, त्यांनी अर्ज करून हे कार्ड घ्यावे. अर्चना जाधव, नगरसेविका
इंदिरानगर येथे प्रभाग क्रमांक 53 मध्ये नगरसेविका अर्चना जाधव यांच्या हस्ते ज्येष्ठांना हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले.