आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभाजनाची टांगती तलवार आरोग्य विद्यापीठावर कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा "पीपीपी'च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात येणार असल्याने, तूर्तास विद्यापीठ विभाजनाचा सरकारचा कोणताही विचार नाही. विभाजनाविषयी कोणतीही चर्चा आजपर्यंत झालेली नाही. मात्र, केंद्र सरकारच्या प्रस्तावानंतर अायुष विद्यापीठाच्या अभ्यासासाठी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर गरज पडल्यास भविष्यात स्वतंत्र आयुष विद्यापीठाची निर्मिती होऊ शकेल, अशी माहिती देत राज्याचे शालेय वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विभाजनाच्या मुद्यावर अधिक बोलणे टाळून वेळ मारून नेली.

विद्यापीठाच्या मुख्यालयात तावडे यांनी गुरुवारी भेट दिली. कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या उपस्थितीत विद्यापीठाचे विविध प्रश्न जाणून घेण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर तावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, विद्यापीठाचे विभाजन करून आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी या विद्याशाखांच्या महाविद्यालयांसाठी नागपूर येथे स्वतंत्र आयुष विद्यापीठ स्थापन करण्याबाबत प्रयत्न होत असल्याची उलटसुलट चर्चा सुरू अाहे. मात्र, विद्यापीठाच्या विभाजनाबाबत आतापर्यंत कोणतीही चर्चा झालेली नसून, त्यासाठी जागाही दिलेली नाही. विद्यापीठाचा विस्तार करण्याचा विचार असून, त्यासाठी महापालिकेचे सहकार्य घेण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता मिळविण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करणार असल्याचे ते म्हणाले. माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव आहेर यांचे स्वप्न होते की, विद्यापीठाचा विस्तार व्हावा, त्यादृष्टीने प्रयत्न केले जात असल्याची माहिती देत विभाजनाचा प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, आयुर्वेदासह युनानी, होमिओपॅथी या विद्याशाखांसाठी आयुष विद्यापीठ स्थापन करण्याबाबत गठित केलेली समिती अभ्यास करत असून, समितीच्या निष्कर्षानंतरच त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगत त्यांनी विभाजनाबाबत अधिक बोलणे टाळून संभ्रमावस्था कायम ठेवली. या वेळी आमदार देवयानी फरांदे, अपूर्व हिरे, बाळासाहेब सानप, डॉ. राहुल आहेर, आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, लक्ष्मण सावजी आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

एक लाख कुशल मनुष्यबळ निर्माण करणार : हेल्थ इंडस्ट्री वेगाने वृद्धिंगत होत असल्याने या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मागणी मोठी आहे. आगामी काळात आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याने आरोग्य विद्यापीठाच्या माध्यमातून विविध व्यावसायिक कौशल्याचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील. त्यातून तब्बल लाख कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री तावडे यांनी या वेळी दिली.

अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार
आरोग्यविज्ञान विद्यापीठाचा विस्तार करतानाच विद्यापीठाचे प्रलंबित प्रश्न सोडवून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्नही मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही या वेळी तावडे यांनी दिली. सेवानिवृत्ती वेतन, कर्मचाऱ्यांची नेमणूक यांसह इतर मागण्यांवर सकारात्मक विचार झाल्याची माहितीही त्यांनी दिली.