आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक महानगरावर दाट धुक्याची दुलई; थंडी वाढण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिककरांची शनिवारची पहाट उगवली तीच शहरावर दाटलेल्या दाट धुक्याच्या आच्छादनात. या दाट धुक्यातून वाहनचालकांना अक्षरश: वाट शोधावी लागत होती. दवबिंदूंच्या वर्षावाने पावसाच्या सरी पडल्याचे वातावरण होते. गुलाबी थंडी आणि धुके असे धुंद-फुंद वातावरण दुपारनंतरही कायम होते.

दोन दिवसांपासून राज्यात बेमोसमी पाऊस झाल्याने जमिनीतील आणि जमिनीवरील तपमानात तफावत वाढली आहे. जमिनीतून बाष्पीभवन होत असल्याने धुक्यात वाढ होत असते, मात्र शनिवारी हवा मोठ्या प्रमाणात मंदावल्याने आणि आर्द्रताही ९८ टक्क्यांपर्यंत गेल्याने ढग तयार झाले नाही. त्यामुळे धुके वरती जाता थेट जमिनीवर आले.

ढगाळ वातावरणामुळे तपमानात सातत बदल होत आहे. पावसामुळे जमिनीतून बाष्प जमिनीवर येत असल्याने वातावरणातील आर्द्रता वाढली होती. शनिवारी आर्द्रता ही ९८ टक्क्यांपर्यंत गेली होती. तसेच, बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा विरळ झाला आहे, तर राजस्थानपर्यंत हवेच्या खालच्या थरापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. आर्द्रता वाढल्याने ढग विरळ होऊन धुक्यामध्ये वाढ झाली आहे. यामुळे सकाळी आठ वाजेपर्यंतही वाहने चालविण्यासाठी दिवे लावावे लागले होते. त्यामुळे ताशी दहा ते वीस किलोमीटर अंतराने वाहने चालवावी लागत होती.

द्राक्षावर डाऊनीची शक्यता

^धुक्यामुळे कांदा पिकावर करपा रोग वाढण्याची शक्यता आहे, तर द्राक्षावर भुरी आणि डाऊनीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र, भविष्यात धुक्यामुळे काहीही परिणाम होणार नाही. आर.बी. सोनवणे, द्राक्षआणि कांदा संशोधन केंद्र, पिंपळगाव

..तर थंडीत होईल आणखी वाढ
^सध्या तयार झालेले ढगाळ वातावरण दोन दिवसांनंतर निवळणार असून, आकाश स्वच्छ झाल्यास थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण असल्याने तपमानात झालेली वाढ हे वातावरण निवळल्यास घसरण्याचीही शक्यता आहे. -व्ही. के.राजू, हवामानतज्ज्ञ

वाऱ्याचा वेग कमी झाल्याने धुके
^या आठवड्यात हवेतील आर्द्रतेमध्ये वाढ झाल्याने तसेच वाऱ्याचा वेग कमी असल्याने धुक्यामध्ये वाढ झाली. हे वातावरण शहर परिसरात उद्यापर्यंत असेच राहण्याची शक्यता आहे. डी.एस. घाटे, हवामानतज्ज्ञ

पावसामुळे जमिनीतील उष्णतेचे बाष्पात रूपांतर
पावसामुळे जमिनीतील उष्णतेचे बाष्पात रूपांतर वाढल्याने आर्द्रतेमध्ये वाढ झाली होती. तसेच, आकाशात हवेचा वेग मंदावल्याने ढग तयार झाले नाही. त्यामुळे धुके जमिनीपर्यंत आले होते. धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने वाहनाने प्रवास करणाऱ्यांना पाऊस पडल्यासारखे जाणवत होते. शनिवारी तपमानात वाढ होऊन शहरात किमान १३.९, तर कमाल २५.३ अंश सेल्सिअस असे नोंदले गेले.