आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परतीच्या प्रवासात पावसाचा राज्यावर मायेचा ‘अाेलावा’, जळगाव, धुळे जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक/ साेलापूर - परतीच्या पावसाने दुष्काळी मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात दमदार हजेरी लावल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र सुखावला अाहे. शनिवारी व रविवारी या दाेन दिवसांत मराठवाडा-विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, काेकणात कमी- अधिक प्रमाणात पाऊस काेसळला. पुणे, नगर, नाशिक, साेलापूर, जळगाव, धुळे जिल्ह्यांतही वरुणराजा मनसाेक्त बरसला. त्यामुळे नदी-नाले अाेसंडून वाहू लागले. साेलापूरच्या उजनी धरणासह बहुतांश धरणेही तृप्त झाली अाहेत.

हस्त नक्षत्राची रिपरिम रविवारीही साेलापूर जिल्ह्यात हाेती. उजनी धरणात १०३ टक्के पाणीसाठा (एकूण १११९.२६ टीएमसी) झाला असून भीमा नदी व कालव्यातून साडेतीन हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. सिना नदीसह भोगावती, नागझरी, नीलकंठा या नद्यांसह ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. असाच पाऊस राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. करमाळ्यात ६० मिलीमीटर पाऊस पडला. माढ्यात शनिवारी रात्री जोराचा पाऊस झाला. सीना नदी दुथडी भरून वाहत असून मोहोळ, उत्तर सोलापूर तालुक्यातील बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मोहोळ, बार्शी तालुक्यातील अनेक पुलांवर पाणी आल्याने काही गावांचा संपर्क तुटला हाेता. भोगावती नदीला पूर आल्याने नरखेड - मसले चौधरी रस्त्याचा भराव खचल्याने वाहतूक ठप्प झाली. बार्शी तालुक्यातील हिंगणी, जवळगाव, ढाळे पिंपळगाव हे मध्यम तर सर्व लघु प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. काही ठिकाणी तलाव फुटून शेतामध्ये पाणी घुसले आहे. पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला तालुक्यात रविवारी रिमझिम पाऊस पडला. सांगोल्यात शनिवारी रात्री बऱ्यापैकी पाऊस झाला. परंतु या तालुक्यात अद्याप जलस्रोत कोरडेच आहेत. आणखी तीन दिवस हलका पाऊस राहील, असा हवामान खात्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

नाशकात दमदार : रविवारी पहाटे नाशिक शहर व जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी पाचच्या सुमारासही वरुणराजाने हजेरी लावली. या पावसाने द्राक्ष व इतर पिकांचे नुकसान झाले अाहे. दरम्यान, गंगापूरसह जिल्ह्यातील इतर धरणांतील पाणीपातळीत वाढ झाली अाहे.

नगर जिल्ह्यात संततधार
नगर| जिल्ह्यात पावसाचा जोर रविवारी कायम होता. संततधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला होता. जामखेड शहराजवळील कर्जत रस्त्यावरील नदीला पूर आल्याने संपर्क तुटला. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २३.१२ मिलिमीटर नोंद झाली आहे. येत्या २४ तासांत पावसाचा जोर अाणखी वाढण्याची शक्यता आहे. नगर शहरासह जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासे, नगर, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, कर्जत, जामखेड व श्रीगोंदे या तालुक्यांत शनिवारपासून चांगली वृष्टी होत आहे. जिल्ह्याची पावसाची सरासरी ४८७ मिलिमीटर आहे. आतापर्यंत ६०२.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...