आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाऊस सर्वदूर, नदीनाल्यांना पूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक/नाशिकरोड - शहरात बुधवारपासून सुरू झालेला पाऊस गुरुवारीही दिवसभर बरसत होता. नाशिक हवामान केंद्रात 28.4 मिलिमीटर पावसाची गुरुवारी नोंद करण्यात आली. दरम्यान, संततधार पावसामुळे गोदावरी, नासर्डी तसेच देवळाली गाव येथील वालदेवी नदी दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने गोदावरीला पूर आला आहे. जुलैत एकही दिवस पावसाविना न गेल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

हवामान खात्याने या वर्षी सरासरीइतका पाऊस पडणार असल्याचा अंदाज दिला होता. त्यानुसार जुलैपर्यंत अंदाज खरा ठरला. शहरात या महिन्यात एकूण 233.7 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गेल्या आठ वर्षांत जुलैतील सर्वाधिक पाऊस 2006 मध्ये (350. 2 मिलिमीटर) झाला आहे.

गंगापूर धरण 83 टक्के भरले
इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे अनुक्रमे 74 व 64 मि.मी. पावसाची नोंद गुरुवारी झाली. गंगापूर धरणही 83 टक्क्यांपेक्षा अधिक भरल्याने धरणातून गुरुवारी सायंकाळी 8 वाजेपर्यंत सात हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी दुथडी वाहात असून, काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशाराही पाटबंधारे विभाग व पालिकेने दिला आहे.

दारणातून विसर्ग
दारणा धरणही 75 टक्के भरले असून, सततच्या पावसाने धरणाची पातळी राखण्यासाठी पाटबंधारे विभागाने पंधरा दिवसांपासून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी दारणातून 10 हजार 700 क्यूसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यातून जवळपास 17 हजार 700 पेक्षा अधिक क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे.

आयटीआय पुलावर पाणीच पाणी
बुधवारपासून संततधार पाऊस सुरू असल्याने रस्त्यावरील पाणी आयटीआय ते खुटवडनगर परिसराला जोडणार्‍या नासर्डी नदीवरील आयटीआय पुलावर येऊन साचते. या पाण्याचा निचरा होण्यास जागाच नसल्याने पुलाला तळ्याचे स्वरूप प्राप्त होते. सातपूरहून खुटवडनगरकडे जाणार्‍या वाहनधारकांची वाहने पाण्यामुळे नादुरुस्त होत असल्याने पुलावरच वाहतुकीचा खोळंबा होतो.