आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार, तीन दिवसांत राज्यात अतिवृष्टीचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक जिल्ह्यात सोमवारपासून अहोरात्र मुसळधार पडणार्‍या पावसामुळे सर्व पर्वतरांगातील धबधबे वाहू लागले असून गोदावरी नदीही खळाळून वाहत आहे. या पावसाने दुष्काळाच्या धास्तीने बेजार झालेल्या नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सोमवारपर्यंत त्र्यंबेकश्वर परिसरात 24 तासात 102 मि.मी. पाऊस पडला. पावसाने पहाटेपासून तर जास्तच जोर धरला होता. पहाटे नीलपर्वतावरून खाली येणारे पाणी लोणारगल्लीत साचले होते. पर्यटन केंद्राजवळ पाइपलाइनसाठीच्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अद्याप पावसाचा वेग कायम आहे. त्र्यंबकेश्वर नगरीतील जलाशये भरली आहेत. इगतपुरी तालुक्यातालाही दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.
तीन दिवसांत राज्यात अतिवृष्टीचा इशारा
पुणे - राज्यात सलग तिसर्‍या दिवशी मंगळवारी पावसाने सर्वदूर हजेरी लावली असून आगामी तीन दिवस वरुणराजा असाच प्रसन्न राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. असे असले तरी मराठवाड्यात मात्र अजूनही अपेक्षित पाऊस बरसलेला नाही. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर, दोन्ही ठिकाणी कमी दाबाचे पट्टे सक्रिय झाल्याने राज्यभरात मान्सूनच्या जोरदार सरी कोसळत आहेत. दरम्यान, बुधवारी राज्याच्या किनारी प्रदेशात व मुंबईत अतिवृष्टीचा इशाराही वेधशाळेने दिला आहे.
भंडारदरा धरण परिसरात 383 मिमी विक्रमी पाऊस

भंडारदरा - भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रतनवाडी येथे 383 मिलिमीटर (15.5 इंच), तर घाटघर येथे 293 मिलिमीटर (12 इंच) पाऊस झाला. मंगळवार सायंकाळपर्यंत धरण 50 टक्के भरले.
11 हजार 39 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा मंगळवारी 5 हजार 227 दशलक्ष घनफूट झाला. तासाला 40 दशलक्ष घनफुटाने वाढ होत आहे. प्रवरेची उपनदी कृष्णावंतीचा वाकी जलाशयावरून 1 हजार 30 क्युसेक व रंधा फॉल येथून दोन हजार क्युसेकने निळवंडेत पाणी जात आहे. सध्या या धरणात 12 तासांत 250 दशलक्ष घनफूट पाणी वाढले. मुळा पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरू आहे. मुळा नदीचा कोतूळ येथील विसर्ग 15 हजार 776 क्युसेकने धरणात जात आहे. सध्या धरणात 8,300 दशलक्ष घनफूट साठा आहे.
अकोले तालुक्याच्या दक्षिण भागातही जोरदार पाऊस सुरू आहे. खिरविरे, एकदरा, टाहाकरी येथील जलाशयात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. मुसळधार पावसाने भात लागवडीचे बांध फुटले आहेत. संपूर्ण भातशेते जलमय झाली आहेत. जनजीवनही ठप्प झाले आहे.