आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकरांना धुवाधार पावसाने झोडपले ; रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूकीची कोंडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शहराला रविवारी (दि. १६) दुपारनंतर झोडपून काढले. सायंकाळी ४.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत ३९.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचे पाणी रस्त्यांवरून वाहत असल्याने ठिकठिकाणी वाहने बंद पडली, त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. वीजपुरवठा खंडित झाला तसेच सिडकोसह काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

लक्षद्वीप ते गुजरातपर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने रविवारी पुन्हा शहरासह जिल्ह्यात धुवाधार बेमोसमी पाऊस बरसला. दुपारी चार वाजेपर्यंत अवघ्या पंधरा मिनिटांत ढग जमून पाऊस सुरू झाला.

अरबी समुद्रात कर्नाटक ते गुजरात परिसरात कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पाऊस पडत आहे. रविवारी नाशिकरोड, तिडके कॉलनी, आडगाव, कामटवाडा, गंगापूररोड, कॉलेजरोड, महात्मानगर, राणेनगर, इंदिरानगर येथे पाऊस झाला. तिडके कॉलनी, पोलिस अकॅडमी, सराफ बाजार, सीबीएस या ठिकाणी पाणी साचल्याने वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडाली. तसेच, शहरातील जुने नाशिक, मुंबई नाका, चांडक सर्कल, सीबीएस, महात्मानगर, सिडको, राणेनगर आणि इंदिरानगर आदी भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली होती. सराफ बाजारात पाणी साचल्याने वाहने पाण्यात गेली होती, तर तिडके कॉलनी परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याने दुचाकी बंद पडत असल्याने नागरिकांना ढकलत न्याव्या लागत होत्या.

रस्त्यावरपाणी :पावसामुळे रस्त्यांवरून गुडघ्याइतके पाणी वाहत असल्याने रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली. दोन तास रस्त्यावर वाहने अडकली होती. रस्त्यांवर वेगाने पाणी वाहत असल्याने दुचाकी घसरून पडल्या.रविवार असल्याने सुटीनिमित्त खरेदीसाठी बाहेर पडले होते. त्यांना पावसाने झोडपले. वाहतूक पोलिस आणि नागरिक वाहनांना धक्का देत रस्त्याच्या बाजूला करत होते.
या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा
मुंबईनाका, गडकरी चौक, गोल्फ क्लब, द्वारका, मायको सर्कल, एबीबी सर्कल, महात्मानगर, उंडवाडी, पंचवटी, रामवाडी, सराफ बाजार, दहीपूल या रस्त्यांवर पाणी वाहत असल्याने वाहनचालकांचे हाल झाले. सराफ बाजारात गुडघ्याइतके पाणी साचल्याने वाहने अर्धी बुडाली होती.