आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उकाड्याने नाशिककर घामाघूम, सोमवारी कमाल ३७.६ अंश सेल्सिअसची नोंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उन्हाच्या तीव्रतेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने रविवारी शहरातील तपमानाचा पारा हा ४० अंशांवर पोहोचला होता. त्यामुळे किमान आणि कमाल तपमानात वाढ झाल्याने शहरवासीयांना दिवसरात्र उकाड्याचा सामना करावा लागतो आहे. परिणामी, नागरिकांच्या दिनचर्येत बदल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
सोमवारी शहरात ३७.६, मालेगाव ४०.२, तर जळगाव येथे ४१.२ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वातावरणात आर्द्रताही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
शहरात गत आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने तपमानात वाढ झाली आहे. रविवारी कमाल ४०, तर किमान तपमान २१.५ अंश सेल्सिअस असे नोंदले गेले. सोमवारीही सकाळपासूनच उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असल्याने शहरवासीयांनी यापासून बचाव करण्यासाठी सकाळी लवकर ते रात्री उशिरापर्यंत कामास प्राधान्य दिले.
शहरातील डांबरी रस्ते दुपारी तापत असल्याने उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. या झळांपासून बचाव करण्यासाठी शहरवासीय गॉगल, टोपी, स्कार्फ यांचा वापर करताना दिसून येत आहे. यामुळे सध्या दही, ताक, लिंबू, लस्सी यांच्या मागणीत वाढ झाली आहे. तसेच, तहान भागविण्यासाठी टरबूज उपयुक्त असल्याने त्याची मागणी वाढल्याने सध्या फळ बाजारात १८ ते २० रुपये किलो दराने त्याची विक्री सुरू आहे. तर, उन्हामुळे आलेला थकवा दूर करण्यासाठी लिंबूपाण्याचा अधिक वापर होत आहे. यामुळे लिंबाचे दर वाढले असून, पाच रुपयांना सध्या तीन लिंबू बाजारात मिळत आहेत.

चार दिवसांत उन्हाची तीव्रता अधिक वाढणार

येत्या चार ते पाच दिवस उन्हाची तीव्रता अधिक राहणार असून, तपमान हे ४० ते ४१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मे महिन्यात पहिल्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

रात्री उशिरापर्यंत जॉगिंग ट्रॅकवर कट्ट्यांवर गर्दी

दिवसभरात उन्हाच्या तीव्र झळांमुळे शहरवासीय त्रस्त झाले असून, रात्रीही उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने अनेक जण हे जॉगिंगसाठी रात्री उशिरापर्यंत मैदानावर चालताना किंवा व्यायाम करताना दिसून येत आहेत.
रात्री उशिरापर्यंत कट्ट्यावर तरुणांचा, तर इमारतीमधील बाकांवर महिलांच्या गप्पा चांगल्याच रंगत असल्याचे शहरात चित्र दिसत आहे. उन्हाची काहिली दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरवासीय त्रस्त झाले आहेत. तीव्र उकाड्याचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. वाहनधारक चेहऱ्यावर पांढरे रुमाल स्कार्प गुंडाळून आणि डोळ्यावर गॉगल चढवूनच घराबाहेर पडत आहेत.