आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगाराच्या पत्नीला ‘खाकी’ची मदत, सहायक पाेलिस अायुक्तांनी दिले शिवणयंत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पती एका गुन्ह्यात कारागृहात, यातच दोन कच्च्या-बच्च्यांना घेऊन एकटी राहणारी विवाहिता शिवणकाम करून अापला उदरनिर्वाह करत असताना ते यंत्रही सासू-सासरे घेऊन गेल्याने तिच्यावर उपासमारीची वेळ आली. अशा स्थितीत विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलिस आयुक्तांनी स्वखर्चाने या महिलेला शिवणयंत्र घेऊन देत तिची समस्या दूर करत समाजापुढे एक वेगळा अादर्श ठेवला. यामुळे पोलिस दलाची प्रतिमा उंचावली. एखाद्या गुन्हेगाराच्या पत्नीला उदरनिर्वाहासाठी पोलिसांकडून अशा प्रकारची मदत होण्याची ही पहिलीच वेळ असावी.

एका गुन्ह्यात कारागृहात असलेल्या सराईत गुन्हेगाराच्या पत्नीचे आणि तिच्या सासरच्यांचा वाद झाला. हा वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत गेला. दोघांवर परस्पर विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ही केस विभाग चे सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्याकडे सुरू झाली. याबाबत माहिती घेतली असता दोघांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे समजले. मात्र, यामध्ये अटकेतील गुन्हेगाराच्या पत्नीला उदरनिर्वाहासाठी काहीच साधन नसल्याने तिच्यासह दोन मुलांवर उपासमारीची वेळ येणार होती. अशा स्थितीत कुणीही मदत करत नसल्याने ही बाब लक्षात घेत डॉ. राजू भूजबळ यांनी स्वखर्चाने त्या विवाहितेला शिवणयंत्र घेऊन दिले. विशेष म्हणजे जी सासू शिवणयंत्र घेऊन गेली तिच्यात हस्ते सुनेला शिवणयंत्र द्यायला लावत या सासू-सुनेत दिलजमाई घडवण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. पोलिस अधिकाऱ्याने दाखवलेल्या या माणुसकीने गुन्हेगाराच्या कुटुंबीयांच्या मनात पोलिसांबाबत चांगल्या भावना नक्कीच निर्माण झाल्या असतील.

दोन्ही कुटुंबामध्ये दिलजमाई
सासूने शिवणयंत्र नेल्याने सुनेची मुलांसह उपासमार होणार हाेती. गुन्हेगाराने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या मुलांना भोगावी लागू नये यासाठी माणुसकीच्या भावनेतून शिवणयंत्र दिले. डॉ.राजू भुजबळ, सहायक आयुक्त

आत्मविश्वास मिळाला
पतीने केलेल्या गुन्ह्यामुळे रस्त्यावर आले. सासू-सासऱ्यांनी वाऱ्यावर सोडले. मुलांसह स्वत:च्या उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर होता. पोलिस अधिकाऱ्याच्या रूपाने देवच मदतीला धावून आला. मुलांना चांगले शिक्षण देत त्यांना पोलिसांसारखे चांगला माणून बनवण्याची इच्छा आहे. -गुन्हेगाराची पत्नी
बातम्या आणखी आहेत...