आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात दीड लाखावर रुग्णांवर माेफत उपचार; वर्षभर राज्यात अाराेग्य शिबिरे : महाजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राज्य सरकारच्या वतीने रविवारी नाशिकमध्ये अायाेजित महाअाराेग्य शिबिरात जिल्ह्यातील तब्बल १ लाख ६० हजार रुग्णांवर उपचार करण्यात अाले. शिबिराच्या पूर्वसंध्येला केवळ ७५ हजार रुग्णांनीच नाेंदणी केलेली असताना रविवारी मात्र त्यापेक्षा दुप्पटहून अधिक रुग्णांनी या ठिकाणी हजेरी लावली. प्रत्येक रुग्णास मोफत सेवा मिळावी यासाठी या शिबिराचे अायाेजन करण्यात अाले असून गंभीर अाजारी असलेल्या रुग्णांवरील उपचार एक महिन्यात पूर्ण करण्याचे नियाेजन अाहे, अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
  
गोल्फ क्लब येथे झालेल्या या अाराेग्य शिबिरास जमलेल्या प्रचंड गर्दीमुळे नाशिककरांना पुन्हा एकदा कुंभमेळ्याचीच अाठवण झाली. ‘निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या शिबिराचे अायाेजन केल्याचा काही जण अाराेप करत असले तरी ताे पूर्णपणे राजकीय हेतूने केला जात अाहे.  हे शिबिर काेणत्या एका पक्षाचे नाही,’ असेही महाजन यांनी स्पष्ट केले.  रुग्णांच्या नोंदणीसाठी, त्यांना शिबिरस्थळापर्यंत आणण्यासाठी अापण पक्षीय भेद न ठेवता सर्वांनाच आवाहन केले होते. त्यांनीही रुग्णांची नोंदणी करण्यापासून त्यांना हवी ती मदत देण्यासाठी प्रयत्न करावयास हवे होते, असा टाेलाही त्यांनी लगावला. याेग्य वैद्यकीय उपचारांमुळे एखाद्या व्यक्तीला नवजीवन लाभले, याचे समाधान वेगळेच असते. हे मी २५ ते ३० वर्षांपासून अनुभवतोय.  राज्यातील प्रत्येक रुग्णास उत्तम आरोग्य सेवा मोफत मिळावी, त्याच दृष्टीने आम्ही आता पुढे जाणार अाहाेत. राज्यात वर्षभर अशीच शिबिरे सुरू राहतील, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.  
 
 
या शिबिरास सहकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, स्वसंयेवक, मदतगार, उद्योजक, व्यावसायिक, तसेच शिबिरासाठी आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांचे, शासकीय यंत्रणेचेही त्यांनी अाभार मानले.  शिबिराच्या आयोजनामागील उद्देश आणि काेणत्या राेगांवर उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिलेली अाहे. याची माहिती रामेश्वर नाईक यांनी प्रास्ताविकात दिली. या वेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, चंदूभय्या पटेल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, रिलायन्स फाउंडेशनचे गुस्ताद डावर, महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज, सोमेश्वरानंद सरस्वती आदी उपस्थित होते.
  
हृदयविकाराने त्रस्त दीड वर्षीय मुलीचा मृत्यू  
महाआरोग्य शिबिरात उपचारासाठी आलेल्या दीडवर्षीय मुलीचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. हृदयविकाराचा त्रास असल्याने दीक्षा माेरे या मुलीला घेऊन तिचे पालक शिबिरात अाले हाेते. मात्र तिथेच तिला अस्वस्थ वाटू लागल्याने मुंबईतील डाॅ. वेलूलकर व डॉ. विशाल विजन यांनी तिची तपासणी करून तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिला तातडीने अतिदक्षता विभागात हलविण्यातही अाले. मात्र बालराेग तज्ज्ञांनी तिथे तिला तपासून मृत घाेषित केले. ही घटना समजताच पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे अादींनी माेरे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

समाजसेवकांची पिढी तयार होईल : महाजन 
केवळ सेवाभाव डोळ्यासमोर ठेवून या शिबिराचे आयोजन केले आहे. यातूनच समाजसेवकांची चांगली पिढी तयार होईल. अाणि अाराेग्यसेवकांची एक टीमच तयार होईल, असा विश्वास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या वेळी व्यक्त केला.  
बातम्या आणखी आहेत...