आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हिमोफिलीक’ रुग्णांना होमिओपॅथीचे वरदान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गुणसूत्रातील जन्मजात बिघाडामुळे होणार्‍या हिमोफिलीया आजारावर आधुनिक वैद्यकशास्त्रात कोणतेही प्रभावी औषध अस्तित्वात नव्हते. मात्र, अँलोपॅथी उपचारांना होमिओपॅथीच्या विशेष उपचारांची जोड दिल्यास हिमोफिलीया रुग्ण त्या आजारावर मात करू शकतील, असे औषध संशोधनाअंती गवसले असल्याचे होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ. थॉमस कुंडू यांनी सांगितले.

मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या वतीने रविवारी झालेल्या ‘होमिओपॅथीतील शास्त्रोक्त संशोधन’ या विषयावरील चर्चासत्रानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सहा जणांनी मिळून केलेल्या या संशोधनामुळे हिमोफिलीयाच्या रुग्णांना दिलासा मिळू शकणारे औषध शोधण्यात यश आल्याचे डॉ. कुंडू यांनी नमूद केले. अँलोपॅथीतील अँटी हिमोफिलीक फॅक्टर्स आणि होमिओपॅथीच्या या नव्या संशोधनाच्या औषधाद्वारे या आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले. आतापर्यंत तब्बल 450 हून अधिक रुग्णांना त्याचा फायदा झाला असून, या उपचाराचा खर्चदेखील अगदी गरीब कुटुंबाच्यादेखील आवाक्यातला असल्याचे त्यांनी सांगितले. या आजारात शरीरातील रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावते. मात्र, होमिओपॅथीच्या या औषधांद्वारे ही प्रक्रिया कायम होत असल्याने शरीरातून रक्त वाहून मृत्यूचे प्रमाण अत्यल्प होणार असल्याचा दावादेखील डॉ. कुंडू यांनी केला.

या उपचारपद्धतीबाबतची माहिती अधिकाधिक होमिओपॅथीतज्ज्ञांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न राहणार असून, त्यासाठी देशातील अधिकाधिक केंद्रांवरही हे उपचार उपलब्ध करू देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे सदस्य डॉ. व्ही. आर. कविश्वर यांनी सांगितले. या वेळी मोतीवाला होमिओपॅथी कॉलेजचे संस्थापक डॉ. फारुख मोतीवाला, डॉ. जे. डी. जिंदल आणि डॉ. अफजल कुट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. मोतीवाला होमिओपॅथिक कॉलेजमध्ये झालेल्या संशोधनाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने आयोजित चर्चासत्रात विद्यार्थी सहभागी झाले होते.

होमिओपॅथीची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल
आधुनिक वैद्यकशास्त्राची संशोधने प्रकाशित करणार्‍या ‘एल्सवेअर’ या प्रकाशनाने डॉ. कुंडू यांच्या संशोधनाची दखल घेत ‘होमिओपॅथी इन हिमोफिलीया’ या नावाने त्यांच्या र्जनलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध केले आहे. या संशोधनामुळे होमिओपॅथीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान मिळाले आहे. डॉ. फारुख मोतीवाला, संचालक, मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज