नाशिक - पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या ९५ हेक्टर जागेवर वनौषधी उद्यान उभारण्याचा मार्ग माेकळा झाला असून, १२ मे रोजी वन विभागामार्फत जागा हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू होईल. प्रथम वनविकास महामंडळाला त्यांच्यामार्फत महापालिकेला जागा विकसनासाठी १८ मेपर्यंत देण्याचे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मंत्रालयातील बैठकीत दिले.
वनोषधी उद्यान उभारण्याचा संकल्प राज ठाकरे यांनी सोडला होता. ठाकरे यांची वनमंत्र्यांबराेबर मंत्रालयात यापूर्वीही बैठक झाली होती. या बैठकीत वनमंत्र्यांनी जागा देण्यास तत्त्वत: तयारी दर्शवली हाेती. ठाकरे यांनी काेणतेही पक्के बांधकाम वा पर्यावरणाला धोका पोहचेल, अशी कामे होणार नसल्याची ग्वाही दिली होती. दुसर्या टप्प्यातील बैठक मंगळवारी मंत्रालयात झाली. महापौर अशोक मुर्तडक, महापालिका आयुक्त डाॅ. प्रवीण गेडाम, मनसे महानगरप्रमुख अॅड. राहुल ढिकले, डाॅ. प्रदीप पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते. या वेळी मुनगंटीवार यांनी वन विभागामार्फत तातडीने जीआर तथा शासन निर्णय काढून वन विभागामार्फत वनविकास महामंडळाला जागा हस्तांतरित करण्याचे आश्वासन दिले. १२ मेपर्यंत ही प्रक्रिया हाेईल. १८ मेपर्यंत जागा हस्तांतरण करारनाम्याची प्रक्रिया हाेणार आहे. त्यानंतर महापालिका ही जागा टाटा फाउंडेशनला विकसित करण्यासाठी सुपूर्द करेल. महिना अखेरीस कामाचे भूमिपूजन केले जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात २५ हेक्टरवर हाेणार प्रकल्प
टाटा फाउंडेशन येथे केवळ वनाैषधी उद्यानच नाही, तर दुर्मिळ पशू-पक्ष्यांच्या रहिवासासाठी आवश्यक वातावरणही तयार करणार आहे. त्यांच्या हुबेहूब प्रतिकृतीही तेथे असतील. म्युझियम आणि विविध प्रकारचे छाेटे प्रकल्प साकारण्यात येतील. माहितीपट दाखविण्याचेही नियाेजन आहे. यासंदर्भातील विस्तृत सादरीकरण मुनगंटीवार ठाकरे यांच्यासमाेर करण्यात आले. एकूण ९५ हेक्टर जागा हस्तांतरित केली जाणार असून, त्यापैकी २५ हेक्टरवर पहिल्या टप्प्यात प्रकल्प हाेईल, असे सांगण्यात आलेे.