आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रजासत्ताक दिन समारंभाच्या पार्श्वभूमीवर शहरात हाय अलर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याने देशात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र नाकेबंदी, कोम्बिंग ऑपरेशनसह धार्मिक स्थळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. शहरात येणाऱ्या संशयित वाहनांवर पाळत ठेवली जात असून, राज्य गुप्तवार्ता विभागासह सर्व गोपनीय यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.
देशात इसिसकडे आकर्षित होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. एनआयए आणि एटीएस विभागाकडून देशभरात कारवाई करून इसिसकडे आकर्षित होणाऱ्या तरुणांची धरपकड सुरू आहे. राज्यातील औरंगाबाद, माझगाव आणि धुळे येथे इसिसच्या संपर्कात असलेल्या तरुणांना पकडण्यात यश आले. प्रजासत्ताकदिनी देशात दहशतवादी हल्ला होण्याची शंका असल्याने केंद्रीय आणि राज्य सरकारने गंभीर दखल घेत राज्यात आणि सर्व जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित केला आहे. नाशिकमध्येही हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला शहरात विविध कारवायांसाठी पोलिस सक्रिय झाले आहेत. कोम्बिंग, नाकेबंदी, ऑलआऊट आणि गुन्हेगारांवर प्रतिबंध कारवाई करण्यात येत आहे. समाजकंटकांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. शहर पोलिस आयुक्तालयातील १३ पोलिस ठाण्यांतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिसरातील धार्मिक स्थळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राज्य गुप्तवार्ता विभाग, बीडीडीएस, श्वानपथक, गुन्हे शाखा आणि विशेष शाखेकडून गोपनीय बंदोबस्त शहरातील काही ठिकाणी लावण्यात आला आहे. शहरात येणारी संशयित वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवता तत्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी केले आहे.

या परिसरात तपासणी
शहरातील बसस्थानक, रेल्वे स्टेशन, शाळा, महाविद्यालय, गजबजलेली ठिकाणी, रामकुुंड आणि सर्वच धार्मिक स्थळांची श्वानपथकासह बीडीडीएस पथकाकडून तपासणी करण्यावर भर दिला जात आहे.

नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे
^प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरात सुरक्षेच्या कारणास्तव दक्षता घेतली जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कुठेही अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ पोलिसांना कळवून सहकार्य करावे. एस. जगन्नाथन, पोलिसआयुक्त

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला साेमवारी नाशिकराेड रेल्वेस्थानकावर निमलष्करी दलाच्या जवानांचा असा बंदाेबस्त हाेता. तर, नाशिकमधील पाेलिस परेड मैदानाची कसून तपासणी करताना बाॅम्बशाेधक पथक.