आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकमध्ये हाय अलर्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवटी - सांस्कृतिक नगरी असलेल्या पुण्याला दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा लक्ष्य करत सलग पाच बॉम्बस्फोट घडवून महाराष्ट्राला हादरा दिला. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, पंचवटी परिसरातील धार्मिक स्थळांची बॉम्बशोध पथक आणि पोलिस पथकाने पाहणी केली. आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या दृष्टीने व एकूणच धार्मिक ठिकाणी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता, शहर पोलिसांकडून गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात येत आहे.

पुणे शहरात सलग पाच साखळीबॉम्बस्फोट घडवून दहशतवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर धार्मिक क्षेत्र म्हणून ओळख असलेले नाशिक दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याने शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, या पार्श्वभूमीवर सहायक आयुक्त गणेश शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव भोसले, शशिकांत महाजन, बॉम्ब शोध पथकाचे अधिकारी व श्वान पथकांसह पोलिस कर्मचार्‍यांनी काळाराम मंदिर, तपोवन, रामकुंड आदी परिसराची, तर गंगापूर पोलिसांनी सोमेश्वर मंदिर, बिग बाजार, सिनेमॅक्स, व कॉलेजरोड परिसराची पाहणी केली.

पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलिसांनी गुरुवारी सकाळी गोदाकाठावरील धार्मिकस्थळांची पाहणी केली. बॉम्बशोध पथकाचे कर्मचारी, श्वानपथक, सहायक आयुक्त गणेश शिंदे, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव भोसले यांच्यासह पथकाने सकाळी तपोवन, कपिला संगम, काळाराम मंदिर, तपोवनातील मंदिर, रामकुंड परिसर, कपालेश्वर मंदिर, निमाणी बसस्थानक, बाजार समिती आदी परिसराला भेट दिली. कोणतीही अनुचित वस्तू वा व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी वा भाविकांनी घाबरून न जाता अशा संशयास्पद वस्तू, वाहने, संशयास्पद व्यक्तींची माहिती पोलिसांना देण्याची सूचना यंत्रणेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. त्यासाठी पोलिसांचे शीघ्र कृती दल, बॉम्बशोध पथक, एटीएस, गोपनीय शाखा, पोलिस विशेष शाखा, गुन्हेशोध पथक, राखीव दलाचे जवान यांच्यासह शहर पोलिस कर्मचार्‍यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे.
गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष - शहरातील विविध मॉल, तसेच सोमेश्वर मंदिरासारखी धार्मिक स्थळे आदी गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. र्शावण महिन्यात पंचवटीतील धार्मिक ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता या ठिकाणी पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी सूचना करण्यात येत आहे. संदीप दिवाण, पोलिस उपआयुक्त
प्रबोधिनीसह धार्मिक स्थळांची तपासणी - पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीच्या परिसरासह शहरातील धार्मिक स्थळे, गर्दीच्या ठिकाणांची तपासणी केली. लष्कर ए-तोयबाचा सदस्य लालबाबा उर्फ शेख बिलाल यास पकडण्यात आले असता त्याच्याकडून पोलिस प्रबोधिनीची रेकी केल्याची माहिती उघड झाली होती. राष्ट्रीय दहशतवादविरोधी पथकाने अटक केलेल्या अबू जिंदाल याने प्रबोधिनीवर हल्ल्याची तयारी असल्याची कबुली दिली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त सरंगल, उपआयुक्त संदीप दिवाण, सहायक आयुक्त गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथकासह शीघ्र कृती दलामार्फत तपासणी करण्यात आली. प्रबोधिनीच्या संपूर्ण परिसरात तपासणी मोहीम राबविण्यात आली. पंचवटी, सिडको, सातपूर, येथील धार्मिक स्थळांची पाहणी केली. तसेच, प्रबोधिनीच्या अधिकार्‍यांशीही चर्चा करून सुरक्षिततेचा आढावा घेतला आहे.
पुणे स्फोटातील जखमी पाटीलसह सहा ताब्यात
पुणे : स्फोट नियोजित व संघटित कृत्य- केंद्रीय गृहसचिव