आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये हायअलर्ट; कँडल मार्चने स्फोटांचा निषेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- बुद्धगया येथील साखळी बॉम्बस्फोटांच्या घटनेने नाशकातही हायअलर्ट देण्यात आला. पोलिस यंत्रणेकडून बसस्थानके, मॉल्स, चित्रपटगृहांची तपसाणी करण्याबरोबरच प्रार्थनास्थळांवर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

प्रभारी पोलिस आयुक्त साहेबराव पाटील यांच्या आदेशानुसार सकाळी 10 वाजेपासून शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला. सिटी सेंटर मॉल्स, मोर मॉल्स, बिग बझार यांची श्वानपथक, बॉम्बशोधक व नाशक पथकाद्वारे सखोल तपासणी करण्यात आली. मध्यवर्ती बसस्थानके, महामार्ग बसस्थानक, नवीन बसस्थानक, नाशिकरोड रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या पथकाने तपासणी केली. मॉल्समध्ये संशयास्पद वस्तू आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आदेश सुरक्षारक्षकांना देण्यात आले आहेत. काळाराम मंदिर, कालिका माता मंदिर, जुन्या नाशकातील मशिदीस भेट देऊन तेथील सुरक्षेचा आढावा घेतला.

अधिकार्‍यांच्या सुट्या रद्द : हायअलर्ट घोषित झाल्याने रविवार सुटी असलेल्या पोलिस अधिकार्‍यांची सुटी रद्द करून त्यांना कामावर बोलाविण्यात आले.

भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र बुद्धगया येथील बॉम्बस्फोटांच्या घटनेचा अत्याचारविरोधी कृती समितीच्या वतीने रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कँडल मार्च काढून निषेध करण्यात आला. मार्चमध्ये बौद्ध बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शिवाजीरोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मार्चला सुरुवात झाली. शालिमार, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, सांगली बँक सिग्नल व तेथून पुन्हा शालिमार चौक मार्गे शिवाजीरोडवरील डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर मार्च आला. या ठिकाणी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बुद्धवंदना घेऊन मार्चची सांगता करण्यात आली. या वेळी नगरसेवक संजय साबळे, कविता कर्डक, राजू रायमाळे, अतुल भोसेकर, किशोर घाटे, राहुल तुपलोंढे, बाबासाहेब नन्नावरे, अविनाश आहेर, अँड. अरुण दोंदे, प्रभाकर वायचळे, करुणासागर पगारे, संजय गायकवाड, के. के. बच्छाव, सतीश पवार, अनघा भोसेकर, जयंत खडताळे, नितीन बागुल, भारत तेजाळे, डॉ. संदीप दिवे, डॉ. संजय जाधव यांच्यासह बौद्ध बांधव मोठय़ा संख्येने या मार्चमध्ये सहभागी झाले होते. दरम्यान, एकलहरा येथे या घटनेचा निषेध करण्यात आला. जेलरोडवरील भीमनगरात दुकाने बंद करण्यात आली.