आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High Way Police Develop Mobile Application For Accident Aid

मोबाइलच्या क्लिकवर मिळणार अपघातग्रस्तांना मदत, महामार्ग पोलिसांनी विकसित केले अँप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महामार्गावरील अपघातात जखमींना वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या वाढत असून, यावर नियंत्रणासाठी महामार्ग पोलिसांनी एनर्जी लॅब कंपनीच्या साहाय्याने ‘स्वरक्षा’ हे मोबाइल अँप्लिकेशन विकसित केले आहे. अपघातस्थळी जखमी असो की इतर वाहनचालक, बघणारे यांनी मोबाइलवर क्लिक करताच तातडीने जागेवर मदत उपलब्ध होणार आहे.
अँप्लिकेशनमधील प्रेस फॉर इर्मजन्सी हे बटन दाबल्यास संबंधित व्यक्ती अडचणीत असल्याचा संदेश तिच्या घरच्यांना व महामार्ग पोलिस नियंत्रण कक्ष, मुंबई येथे प्राप्त होईल. याकरिता पोलिस नियंत्रण कक्षात तीन वायरलेस ऑपरेटर नियुक्त करण्यात आले आहेत. या ऑपरेटर्सद्वारे ज्या मोबाइलवरून फोन आला, त्या ठिकाणचे स्थळ समोरच्याकडून सांगितले गेले नसले तरी जीपीएसमार्फत शोधले जाईल. तसेच, संबंधित या नेटवर्कमध्ये नसल्यास त्या व्यक्तीच्या सिमकार्डच्या लोकेशनवरून त्यांचा शाोध घेत त्याच्यापर्यंत मदत पोहोचवली जाईल. अवघ्या पाच ते दहा मिनिटांतच जखमींना रुग्णवाहिकेसह मदत केली जाणार आहे. यासाठी नियंत्रण कक्षातून संबंधित सर्वांशी संपर्क साधून घटनास्थळी मदत पोहोचली की नाही, याची खात्री केली जाणार आहे.
दोन वेळा ‘क्लिक’
अँप्लिकेशन आयकॉनवर क्लिक केल्यास स्वरक्षा अँप उघडते. त्यावर एकदा क्लिक केल्यास नियंत्रण कक्षास संदेश पोहोचून अपघाताची माहिती प्राप्त होते. सदर एसएमएसमध्ये पाठविणार्‍यांचे जीपीएस लोकेशन असते.
‘स्वरक्षा’ ठरणार लाभदायी
महामार्गावर होणार्‍या अपघातातील जखमींना तत्काळ मदत मिळण्यासाठी ‘स्वरक्षा’ जीवदान देणारे आहे. जखमींना मदतीबरोबरच त्यांचे अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यात येईल. यामुळे वाहतूक कोंडी दूर होण्यासही फायदेशीर ठरेल. -पी. आर. ढोकणे, प्रभारी उपअधीक्षक, महामार्ग
गॅरेज, रुग्णालयांची माहिती उपलब्ध
या अँप्लिकेशनमध्ये वाहनाला अपघात झाला, पंक्चर झाले, बिघाड झाल्यास नजीकच्या गॅरेजचा पत्ता, क्रमांक आहेत. त्याचबरोबर महामार्ग पोलिसांचे टॅप, नजीक पोलिस ठाण्यांचे क्रमांक, खासगी रुग्णालये, रुग्णवाहिकांचे क्रमांकदेखील देण्यात आले आहेत.
गुगलवर मोफत अँप्लिकेशन
‘स्वरक्षा’ गुगलवरून मोफत डाउनलोड करता येईल. अँड्रॉइड मोबाइलवर साधारणत: तीन एसएमएस इतकी जागा त्यास लागते. पाच प्रश्नांचा अर्ज भरून दिल्यावर ते सहजपणे वापरता येईल. त्यात मोबाइलधारकाचे नाव, घरचा पत्ता, रक्तगट, नातलग अथवा मित्रांच्या इर्मजन्सी मोबाइल नंबरचा समावेश असेल.