आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक लेन, सहा अंडरपास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - द्वारका ते नाशिकरोडदरम्यान प्रस्तावित सहापदरीकरणामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहतुकीसाठी एक लेन उपलब्ध होणार असून, या रस्त्यावरील वाहतुकीचा भार लक्षात घेता चार ठिकाणी वाहनांसाठी, तर दोन ठिकाणी पादचार्‍यांसाठी अंडरपाससाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती खासदार समीर भुजबळ यांनी दिली.

‘दिव्य मराठी’ने या सहापदरीकरणामुळे निर्माण होणार्‍या संभाव्य अडचणींसह नागरिकांच्या मनातील प्रश्नांना ‘रस्ता सहापदरी, समस्या बहुपदरी’ या मालिकेतून वाचा फोडली. त्याची दखल घेत खासदार भुजबळांनी नागरिकांच्या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. नाशिक-पुणे महामार्गावरील वाहतूक व रेल्वे स्थानकाला जोडणार्‍या या रस्त्याचे महत्त्व महामार्ग विभागाला लक्षात आणून दिल्याने तीन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर साडेआठ कोटी रुपये खर्चाच्या या कामाला अखेर मंजुरी मिळाली, असे सांगून ते म्हणाले ‘या मार्गावर वाहने व पादचारी रस्त्यासाठी सुमारे 40 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याने पालकमंत्री भुजबळ यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हे काम सिंहस्थ निधीतून करण्याचा निर्णय घेण्यात आला.’

सध्या अस्तित्वात असलेले दत्त मंदिर, फेम थिएटर (बोधलेनगर) व काठे गल्ली चौकातील सिग्नल कायम ठेवले जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सूत्रांनी दिली.

‘पंक्चर’ येणार निम्म्यावर : या महामार्गावर सध्या 24 ‘पंक्चर’ आहेत. त्यापैकी 12 बंद करून गुरुद्वारा, बिटको कॉलेज, घंटी म्हसोबा मंदिर, सेंट झेवियर्स हायस्कूल, उपनगर चौक, गांधीनगर विमानतळ, गांधीनगर, आंबेडकरनगर, शिवाजीनगर, बोधलेनगर, बजरंगवाडी, काठे गल्ली याठिकाणी 12 ‘पंक्चर’ ठेवले जातील. जागेअभावी भुयारी मार्गासाठी अंदाजपत्रकात तरतूद नाही. सहापदरीकरणात चार फूट रुंद, दीड फूट उंचीचे दुभाजक व त्यावर तीन फूट उंचीच्या लोखंडी जाळ्या बसवल्या जाणार आहेत.

महापालिकेचा खोडा
महामार्गावर समांतर रस्त्यासाठी (सर्व्हिसरोड) महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली नसल्याने वाहनधारकांना मुख्य मार्गावरूनच प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे केवळ महामार्ग विभागाच्या ताब्यात असलेल्या जागेतच हे सहापदरीकरण होणार आहे.

इथे वाहनांसाठी अंडरपास
काठे गल्ली, फेम थिएटर चौक, उपनगर व दत्तमंदिर या चार चौकांत वाहनांसाठी लहान उड्डाणपुलांसारखे अंडरपास असतील. दुतर्फा वाहतुकीसाठी प्रत्येकी 15 मीटर रुंद व साडेपाच मीटर उंचीचे स्वतंत्र अंडरपास असल्यामुळे वाहतुकीला अडचण येणार नाही. पाचदारी अंडरपास सात मीटर रुंद (राणेनगरच्या अंडरपाससारखा) असावा, असा प्रस्ताव आहे.