आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hindu Festival News In Marathi, Ramnawami Issue At Nashik, Divya Marathi

श्रीरामांच्या जयघोषात रंगला रथोत्सव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘सियावर रामचंद्रकी जय..’, ‘जय सीता-राम सीता’च्या जयघोषात व ढोल-ताशांच्या गजरात श्रीराम व गरुड रथयात्रेचा प्रारंभ झाला. नियोजित वेळेत रथोत्सवास सुरुवात आणि रथावर एकही पुढारी उपस्थित नसल्याने असंख्य भाविकांना प्रभू श्रीरामचंद्रांचे ‘याचि देही याचि डोळा’ दर्शन झाले. प्रारंभी यंदाचे पूजेचे मानकरी मुकुंदबुवा पुजारी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली.

रथोत्सवांतर्गत दुपारी मंदिरात पूजा करण्यात आली. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती पालखीतून वाद्यांच्या, मंत्रोच्चारांच्या गजरात गरुडरथावर आणण्यात आल्या. पूजा व आरती झाल्यानंतर दोन्ही रथ शेजारी आणून गरुडरथातील मूर्ती श्रीरामरथात विराजमान करण्यात येऊन रथोत्सवास प्रारंभ झाला. श्रीरामरथाची धुरा नंदू मुठे यांनी, तर गरुडरथाची धुरा चंदन पूजाधिकारी यांनी सांभाळली. संस्थानचे विश्वस्त, पदाधिकारी, पुजारी रथावर विराजमान झाले होते. पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपायुक्त अविनाश बारगळ, सहायक आयुक्त पंकज डहाणे, निरीक्षक शांताराम अवसरे यांच्यासह मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात होता.

पालकमंत्री भुजबळ, डॉ. पवार रथासोबत
पालकमंत्री छगन भुजबळ, डॉ. प्रदीप पवार हे रथोत्सवात पायी सहभागी झाले. डॉ. पवार काट्या मारुतीचौकापर्यंत, तर छगन भुजबळ नागचौकापर्यंत रथोत्सवात सहभागी झाले होते. हेमंत गोडसे, दिनकर पाटील आणि विजय पांढरे हे तत्पूर्वीच निघून गेले.

अवभृत स्नानाने सांगता
नियोजित मार्गाने श्रीराम रथ आणि गरुड रथ गौरी पटांगणावर आल्यानंतर तेथून दोन्ही रथ रामकुंडाकडे रवाना झाले. नेपाळी दांपत्य घिवरे यांनी काढलेल्या आकर्षक रांगोळ्यांनी सजलेल्या रस्त्यावरून आलेल्या रथांवर ठिकठिकाणी पुष्पवर्षाव करण्यात आला. रात्री उशिरा अवभृत स्नान सोहळ्याद्वारे पंधरवडाभर चाललेल्या वासंतिक नवरात्र महोत्सवाची सांगता करण्यात आली.

नेत्यांनी पाळली आचारसंहिता
दरवर्षी नेत्यांच्या रथावर पूजा करण्यामुळे रथोत्सवाला उशीर होतो. मात्र, यंदा आचारसंहिता लागू असल्याने नेत्यांनी चांगलाच संयम बाळगला. अनेक जण केवळ पूजा करून काही वेळात रथावरून उतरून भाविकांमध्ये येऊन रथाच्या पुढे मार्गस्थ झाले. राष्ट्रवादी-काँग्रेसचे छगन भुजबळ, मनसेचे डॉ. प्रदीप पवार, महायुतीचे हेमंत गोडसे, बसपचे दिनकर पाटील, ‘आप’चे विजय पांढरे या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांनी रथांचे दर्शन घेतले.