आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहास संग्रहालयास शिवकालीन समृद्धी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ‘त्रिकंटक’ ते ‘नाशिक’पर्यंतचा समग्र प्रवास उलगडणार्‍या बहुप्रतीक्षित इतिहास संग्रहालयाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा परिसस्पर्श लाभणार आहे. संग्रहालयाची संकल्पना पाहता त्यांनी त्यांच्याकडील अनेक शिवकालीन वस्तू तेथे ठेवण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत गोदाघाट विकास व सुधारणा योजना राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून गंगापूररोडवरील जुन्या पंपिंग स्टेशन परिसरात इतिहास संग्रहालय साकारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे सहा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रकल्पात नाशिकचा इतिहास सूत्रबद्ध रीतीने मांडण्यात येणार आहे. तीन महिन्यांपूर्वी या प्रकल्पाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली होती. त्यानंतर काही वास्तुविशारद व इतिहास तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार संग्रहालयात काही फेरबदल सुचवण्यात आले आहेत.

रिलायन्स फाउंडेशनला विकसित करण्यासाठी दिलेल्या गोदापार्कच्या प्रकल्पातच आता या संग्रहालयाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढील अतिरिक्त खर्च फाउंडेशनच करणार आहे. संग्रहालय नाशिकचा इतिहास सांगणारे असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हत्यारे संग्रहालयाचे वैशिष्ट्य ठरणार आहेत. संग्रहालयाचे उद्घाटनदेखील शिवशाहिरांच्या हस्तेच होणार आहे.

काय असेल संग्रहालयात? : सातवाहन, अहिर, चालुक्य, यादव आणि राठोड या राजांच्या काळात बहरलेले नाशिक व त्या काळातील कलेच्या माहितीचे संकलन संग्रहालयात पाहायला मिळणार आहे. अकबरापासून अल्लाउद्दीन खिल्जीपर्यंतच्या काळाची माहिती देताना ‘नाशिक’चे ‘गुलशनाबाद’ कसे झाले, याचेही वर्णन सपुरावा येथे वाचायला मिळेल. मराठा आणि पेशवा काळात नाशिकमध्ये उभारलेल्या कलासंपन्न वैशिष्ट्यपूर्ण वास्तूंची छायाचित्रेही संग्रहालयात पाहायला मिळणार आहेत. ब्रिटिश काळातील जॅक्सनचा खून यासारख्या घटनांची माहितीही येथे असेल. तसेच, पौराणिक काळातील संदर्भही या संग्रहालयात मिळतील. नाशिकमध्ये नावारूपाला आलेल्या पेशव्यांपासून तात्यासाहेब शिरवाडकर, वसंत कानेटकरांसारख्या महनीय व्यक्तिरेखांची माहिती सचित्र असेल. तेली गल्ली, पगडबंद लेन, गाडगीळ गल्ली यांचे नामकरण कसे झाले, याची माहिती व मराठा काळात विकसित झालेल्या मिनिएचर पेंटिंगचे (भारतीय चित्रकला) दाखले येथे पाहायला मिळतील. नाशिकची मंदिरे, घाट, वास्तू, वाडे यांबरोबरच कुंभमेळा काळातील छायाचित्ररूपी पटदेखील संग्रहालयात उलगडण्यात येणार आहे.

सर्वतोपरी मदत
नाशिकच्या समृद्ध इतिहासाची महती या संग्रहालयात असेल. माझ्याकडे शिवकालीन वस्तू आहेत. त्या मी या संग्रहालयासाठी देणार आहे. यासंदर्भात राज ठाकरे यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. माझ्या परीने या प्रकल्पासाठी सर्व मदत करणार आहे. आराखड्याप्रमाणे हा प्रकल्प पूर्णत्वास येईल, अशी मला खात्री आहे. बाबासाहेब पुरंदरे, इतिहास अभ्यासक

बाबासाहेबांचीच इच्छा
इतिहास संग्रहालयासंदर्भात ठाकरे यांनी पुरंदरे यांच्याशी चर्चा केली आहे. गोदापार्कच्या सादरीकरणावेळीच बाबासाहेब संग्रहालयाला भेट देणार होते. परंतु, प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्यांनी नंतरची वेळ दिली आहे. त्यांनी आपल्याकडील काही शिवकालीन वस्तू संग्रहालयात ठेवण्याची इच्छा स्वत:हून ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे. - अँड. यतिन वाघ, महापौर